Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

स्वयंसहायता गटांच्या यशकथांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; ‘उमेद’कडून ३ लाखांचे बक्षीस

3 lakh prize from 'Umed'
, बुधवार, 8 जून 2022 (21:22 IST)
फोटो साभार- सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समुहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे दि. 1 ते 30 जून 2022 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येईल.
 
राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 3 लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 2 लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय 1 लक्ष रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह  आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्यावतीने राज्यात सन 2011 पासून व जिल्ह्यात सन 2018 पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयं सहायता समुहांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांच्या जीवनमानात बदल घडला आहे. या यशोगाथांना दृकश्राव्य माध्यमातून चित्रित करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा 1 ते 30 जून दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
 
स्पर्धकांनी जिल्हास्तरावर 15 जून पर्यंत चित्रफित सादर करावी. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकांपैकी उत्कृष्ट 5 स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांच्या चित्रफिती राज्य कक्षाकडे पाठविण्यात येतील व 30 जून पर्यंत अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिट असावा.  दर्जा उत्तम (HD) असावा, चित्रफित अप्रकाशित असावी.
 
लघुपट निर्मितीत व्यावसायिक, हौशी, स्वयं सहायता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद जिल्हा परिषद व संबंधित तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती  यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
 
या स्पर्धेमुळे राज्यातील स्वयंसहायता गटांच्या यशकथा दृकश्राव्य स्वरूपात समोर येण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मार्क्स कमी मिळाले चिंता नको; 'या' प्रक्रियेने करा पुनर्मूल्यांकन