Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोविड घोटाळाप्रकरणी सुजित पाटकर, बिचुले अटकेत

arrest
, शुक्रवार, 21 जुलै 2023 (08:32 IST)
मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ््याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने खा. संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर आणि डॉ. बिचुले यांना अटक करत त्यांना 27 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खा. राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. ईडीने आज सकाळीच सुरज पाटकर यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
 
खासदार संजय राऊत यांच्या मित्र परिवाराने 100 कोटीचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजित पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.
 
बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगाव : हतनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडले