राज्यात उन्हाच्या झळांनी येत्या काही दिवसांत अंगाची लाही लाही होऊ शकते. विदर्भातील काही जिल्हे उन्हानं तापू लागलेत. चंद्रपुरात सर्वाधिक 39.04 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झालीय, तर अकोल्यात 39 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवलं गेलंय. जळगावातही 38.7 डिग्री सेल्सियस तापमान होतं. तसेच येत्या काही दिवसांत उन्हाळा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने येत्या 3 महिन्यांचा भयंकर गरमी वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवलाय. यानुसार मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.
हवामान विभागानं येत्या चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवलेला असून, दुसऱ्या आठवड्यात विजेच्या कडकडाटासह राज्यात हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बागायतदारांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतातील अनेक राज्यांत येत्या दोन-तीन दिवसांत हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.