मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येत आहे, आपण संघर्ष करत राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. अजित पवारांनी बंडखोरी करून भाजप-सेना सरकारसोबत जायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. नाते आणि काम यामध्ये आता मी गल्लत करणार नाही. तो माझा मोठा भाऊ आहे आणि तो मेठा भाऊच राहणार आहे, असेही त्या म्हणाल्या. अजित पवारांवर बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्याचे दिसून आले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब हेच आमच्या पक्षाचे आश्वासक चेहरा आहेत. शरद पवारांची आजची पत्रकार परिषद ऊर्जा देणारी आहे. शरद पवारांची पत्रकार परिषद पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा आणि त्याकडे संधी म्हणून कसे बघायचे तर ते समजते. शरद पवार यांची प्रतिक्रिया मला ऊर्जा देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात १९८० ची पुनरावृत्ती होणार की नाही, हे काळच ठरवणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
आपले काम आणि नाते हे वेगवेगळे आहे, त्यात गल्लत करणार नाही, दादा हा माझा मोठा भाऊ आहे, माझ्या मनात दादाबद्दल नेहमीच प्रेम राहणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दादा आणि माझा वाद कधीच होणार नाही, पण पक्षाचा प्रश्न आल्यानंतर त्यामध्ये मी गल्लत करणार नाही, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.