Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गरम पाकाच्या पातेल्यात पडून भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

गरम पाकाच्या पातेल्यात पडून भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
, सोमवार, 30 एप्रिल 2018 (17:10 IST)
गुलाबजामसाठीच्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात पडून गंभीररीत्या भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना हिरावाडीतील कालिकानगर येथे घडली आहे. या चिमुरडीचे नाव स्वरा प्रवीण शिरोडे असे होते.
 
या प्रकरणी उपचार घेत असतांना तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. पोलिसांनी मुलीच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
 
सविस्तर वृत्त असे की , हिरावाडी येथील कालिकानगर भागातील साईनाथ रो-हाउस नंबर चारमध्ये शिरोडे कुटुंबीय राहते. शिरोडे यांचा केटरिंग व्यवसाय आहे. रविवारी गुलाबजाम बनविण्यासाठी ऑर्डरसाठी लागत असलेल्या एका पातेल्यात साखरेचा पाक तयार केला होता.
 
पाक थंड होण्यासाठी ठेवला होता. याचवेळी तीन वर्षांची स्वरा ही खेळत असतांना पातेल्याजवळ गेली आणि या गरम पाकाच्या पातेल्यात पडली. 
 
पाक गरम असल्याने ती जबरदस्त भाजली.  ही गंभीर बाब लक्षात येताच शिरोडे कुटुंबीयांनी चिमुरड्या स्वराला उपचारासाठी जुना आडगाव नाक्यावरील खासगी रुग्णालयात स्वराला दाखल केले.
 
या रुग्णालयाने उपचारापूर्वीच सांगितलेली अनामत रक्कम भरून नातेवाइकांनी बाहेरून औषधेही आणून दिली. यानंतर दुपारच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यू झाला असे सांगितले. तेव्हा मात्र नातेवाईकांचा पारा चढला आणि हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. रुग्णालयाची तोडफोड केली आहे.
 
या तोडफोडीने तणाव निर्माण झाल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डी.के. जैन राज्याचे नवे मुख्य सचिव