शिक्षक बदली प्रकरण २५ लाख रुपये घेवून खोटे नियुक्ती आदेश

सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:11 IST)
२५ लाख रुपये घेऊन शिक्षणाधिका-यांच्या बोगस सहीचे खोटे नियुक्ती आदेश दिल्याप्रकरणी येथील खणी विभागातील तुळशीराम शिंदे शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, एक शिक्षक नेता यासह सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज आज शनिवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. या सर्वांविरुद्ध येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ०९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. 
 
लातूरच्या खणी विभागातील तुळशीराम शिंदे प्राथमिक शाळेचे संस्थाचालक राजेंद्र तुळशीराम शिंदे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती महानंदा उस्तुरगे, या शाळेतील शिक्षक तथा संस्थाचालकाचे नातेवाईक गणपती राम माने यांच्यासह शिक्षक संघटनेचे मोहन हाके, भगवान बिरादार, सुर्यकांत बिरादार यांनी या शाळेत शिक्षकपदाची कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सतीश बाबुराव ढगे या युवकाकडून २५ लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे तर शिक्षणाधिका-यांच्या बनावट सहीचे शिक्षक नियुक्तीचे बोगस शासन आदेशही त्यास दिले. ही बाब लक्षात आल्यानंतर या युवकाने वडिलांची पेन्शन आणि शेतमाल विकून आपण हे पैसे दिलेले असून ते परत मिळावे अशी विनवणी संस्थाचालकाकडे केली. पण पैसे देणे तर दूरच, उलट सतीश ढगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येऊ लागली. त्यानंतर ढगे यांनी पोलिसांकडे धाव घेऊन रितसर तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९४ कलम ४२०, ४६८, ४७१, ५०६ प्रमाणे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश ढगे हा कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील भालकी येथे डीएड झालेला युवक असून कायम नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने त्याने या शाळेत तब्बल पाच वर्षे बिनपगारी नोकरीही केली आहे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अवनी वाघीण मृत्यू राहुल गांधी यांची सरकारवर टीका