Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढणार

दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढणार
, सोमवार, 6 डिसेंबर 2021 (08:14 IST)
अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.
 
सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान सध्या सरासरीच्या तुलनेत घटलेले असले तरी ते दोन दिवसांत पूर्ववत होण्याचा अंदाज आहे.  अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे आल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागांत या स्थितीमुळे जोरदार पाऊस झाला.  मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे तेथील रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील ढगाळ वातावरणही एक-दोन दिवसांत दूर होऊन सर्वत्र आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. कोरडय़ा हवामानामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भात दिवसाचे कमाल तापमान सरासरीजवळ आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ते अद्यापही सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे या भागात दिवसा हवेत किंचित गारवा आहे. थंडीची चाहूल?  राज्यात सर्वत्र रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेली रात्रीची थंडी जाणवत नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत ते सरासरीजवळ किंवा त्याखाली जाण्याची शक्यता असल्याने रात्रीचा गारवा वाढणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण