Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले : अशोक चव्हाण

ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले : अशोक चव्हाण
, सोमवार, 31 मे 2021 (07:49 IST)
अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले, अशी घणाघाती टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औरंगाबाद येथील प्रसारमाध्यमांशी ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते.  मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना चव्हाण यांनी राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील ‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते’ या गाण्याचा संदर्भ दिला. मोदी सरकारच्या कारभारातून या गाण्याचे स्मरण होते, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
 
मागील सात वर्षांत देशाला काय मिळाले, हे सांगताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, फर्ड्या वक्त्यांनाही लाजवेल, अशी दमदार पण पोकळ भाषणे मिळाली, खोटी आश्वासने मिळाली, आणि आम्ही जो शब्द दिला, तो तर केवळ निवडणुकीचा एक जुमला होता, असे सांगण्याइतपत निर्ढावलेपणा मिळाला. दक्षिण भारतीय चित्रसृष्टी, बॉलीवूड आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट मिळाले. जुन्या काळातील राजे-रजवाड्यांच्या समारोहांना मागे टाकतील, असे शाही इव्हेंट मिळाले. लोकशाहीची मूल्ये आणि घटनात्मक अधिकारांची गळचेपी मिळाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, प्रसारमाध्यमांवर निर्बंध मिळाले, दडपशाही मिळाली. संवैधानिक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि तपास यंत्रणांचा गैरवापर मिळाला. ढोंगी राष्ट्रवाद व उन्मत्त-आंधळ्या धर्मप्रेमाच्या आडून ज्वलंत प्रश्नांना मागे टाकण्याचे नवे शासकीय धोरण मिळाले, या शब्दांत त्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन पद्धतीने लसीकरण