असं म्हणतात दैव तरी त्याला कोण मारी. हे प्रत्यक्षात आले आहे. रविवारी घाटकोपरहून ठाण्याला जाणाऱ्या बेस्टच्या बस मध्ये एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला. हे पाहून बसचा कंडक्टर देवाच्या रूपाने आला आणि त्या वृद्धाला सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचवले. याचे प्रशिक्षण कंडक्टरने घेतल्यामुळे त्याला हे करणं शक्य झालं. कंडक्टरच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सदर घटना रविवारी पहाटे 2:20 च्या सुमारास घडली. घाटकोपरहून ठाण्याला जाणारी बस मध्ये रोहिदास रामचंद्र पवार हे वृद्ध प्रवास करत होते. बस मुलुंड चेकनाक्यावर आली असता रोहिदास यांना भुरळ आली आणि ते खाली पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बसच्या कंडक्टर अर्जुन पांडुरंग लाड यांना लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत रोहिदास यांना सीपीआर दिले आणि त्यांचा जीव वाचवला. नंतर त्यांना तातडीनं खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. बसचे वाहक अर्जुन यांचा या कामाचे कौतुक केले जात आहे.