राज्यात मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. बचावकार्यासाठी आवश्यक टीम पाठवणार असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने तात्काळ नागरिकांसाठी योग्य मदत पुरवली पाहिजे असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत कोकणातील नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत देणार असल्याची माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी म्हटलय की, अतिशय गंभीर परिस्थिती या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. राज्यात जवळपास ३५० मिली पाऊस पडलेला आहे. यावर उपाय आहे की, त्या ठिकाणी हेलकॉप्टरने लोकांना काढणे, बोटीने काढणे, योग्य जागी नागरिकांना पोहचवून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे.
मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्गाच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी नारायण राणे यांनी संवाद साधला आहे. या दोन्ही कलेक्टरसोबत संपर्क केल्यानंतरच केंद्रीय मंत्री नित्यानंद यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली आहे. यावर त्यांनी संपुर्ण मदतीची शाश्वती दिली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.