मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढली आहे. सत्ता स्थापनेपासून ते कॅबिनेटच्या बैठकीपर्यंत हि जोडी एकदम घट्ट बनून निर्णय घेत आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या परिणाम आता रोजच्या जीवनात दिसायला सुरवात झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये त्यांनी पोलीस वसाहतीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांचे नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव आले. मात्र नंतर त्यांनी आपली चूक सुधारली. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने गेल्या महिनाभरापासून दोघा मंत्र्यांची कॅबिनेट चालवत असल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पोलीस वसाहतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होणार हा योग होता. पोलिस बांधव हे सण उत्सव, कोव्हिड, ऊन वारा पाऊस असतानाही जनतेच रक्षण करतात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. मनुष्यबळ, यंत्रणा हे देण्याचे काम शासनाचे आहे. पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. जुन्या वसाहती आहेत, लिकेज आहेत, प्लास्टर पडत आहेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. जुन्या वसाहतींमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. पोलीस रस्त्यावर असताना घराची चिंता नसावी, तर ते अधिक कार्यक्षमताने काम करु शकतील असेही शिंदे म्हणाले.