Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त उद्या वाहतूक मार्गात बदल

nashik police
नाशिक , गुरूवार, 13 जुलै 2023 (20:26 IST)
The government will change the traffic route tomorrow for its Dari program  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार (दि. 15) रोजी डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने प्रचंड संख्येने वाहने नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे आणि अधिकार्‍यांनी केले आहे.
 
शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त सकाळी सहा वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत मॅरेथॉन चौक ते गंगापूर नाका सिग्नल, गोल्डन जिम ते ठक्‍कर बंगला, जुना गंगापूर नाका सिग्नल ते अहिरराव फोटो स्टुडिओ या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये सुमारे पाचशे एसटी बसेस, सुमारे शंभर सिटीलिंक बसेस व सुमारे दोन हजार खासगी चारचाकी वाहने येतील, असा अंदाज आहे.
 
पार्किंग व्यवस्था
 
त्यामुळे शहरात येणार्‍या बाहेरगावच्या सर्व बसेस ईदगाह मैदान त्र्यंबक रोड किंवा श्रद्धा लॉन्स कोशिरे मळा किंवा पेठ रोडवरील मार्केट यार्डात पार्क कराव्या लागणार आहेत, तर चारचाकी वाहनांसाठी केटीएचएम कॉलेज गंगापूर रोड आणि बी. वाय. के. कॉलेज, कॉलेज रोड या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुचाकी वाहनांसाठी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड आणि बी. वाय. के. कॉलेज व कॉलेज रोड येथे वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
 
पर्यायी मार्ग
या कालावधीत स्थानिक वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. यात गंगापूर रोडकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहने जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स मार्गे मॅरेथॉन चौकात येऊन अशोकस्तंभाकडे जाऊ शकतील, तर अशोकस्तंभाकडून मॅरेथॉन चौकाकडे जाताना जुनी पंडित कॉलनी मार्गे राणे डेअरी व इतर ठिकाणी जाता येईल. गंगापूर रोडने जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड मार्गे इतरत्र जाऊ शकतील.
 
कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांसाठी
ईदगाह मैदान येथे पार्क केलेल्या बसेस तेथून सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभमार्गे कार्यक्रमस्थळी आणता येतील व जाताना गंगापूर रोड-जेहान सर्कल-भोसला टी पॉईंट- महात्मानगर मार्गे -त्र्यंबक रोडने ईदगाह मैदान येथे जाता येईल.
 
सिटीलिंक बसेसचा मार्ग
सिटीलिंक बसेस या ईदगाह मैदान-सीबीएस- अशोकस्तंभ-मॅरेथॉन चौकातून कार्यक्रमस्थळी येतील व जाताना गंगापूर नाका-जेहान सर्कल-भोसला टी पॉईंट मार्गे महात्मानगर-एबीबी सर्कलकडून ठक्‍कर डोम येथे पार्किंगसाठी जातील. वरीलप्रमाणे नियोजन असून, नाशिककरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात मॅरेथॉन चौक ते गंगापूर रोड, चोपडा लॉन्सजवळ आ. फरांदे यांच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता आणि कॅनडा कॉर्नरवर अहिरराव फोटो स्टुडिओ कॉर्नर, तसेच पंडित कॉलनीतील ठक्‍कर बंगला येथे बॅरेकेटिंग केले जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ॲप्सवर पैसे लावून गेम खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे