मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण विभागातही किमान, कमाल तापमानामध्ये वाढ नोंदविली जात असल्याने उन्हाचा चटका तसेच रात्रीचा उकाडा कायम आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. तापमानातील ही वाढ एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातही कायम आहे. अनेक शहरांचे कमाल तापमान गेल्या आठवडय़ापासून सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४ एप्रिलला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ५ एप्रिलला संपूर्ण राज्यावर पावसाचे सावट असणार आहे. ६ एप्रिलला कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.