रोहा तालुक्यातील धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (60) या वृद्ध महिलेची बुधवारी निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. झोपडीपासून 50 मीटर अंतरावरील जंगल पायवाटेवर महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेला खाली पाडून, तोंड जमिनीत दाबून ठार मारले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. महिलेच्या डोक्यावर दगड ठेवलेला आढळून आल्याने खुनाचा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात होते.
लक्ष्मी वाघमारे या आपल्या शेतात असलेल्या वाड्यावर राहत असताना त्यांच्या डोक्यावर दगड घालून काल हत्या करण्यात आली होती.
रोहा पोलिसांनी सदर जागेचा पंचनामा करून पथके नेमून तपास यंत्रणा वाऱ्याच्या दिशेने सर्वत्र फिरवल्याने 24 तासात आरोपीला पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला व रोहा पोलीस स्टेशनला यश आले.
आरोपी मयत महिलेचा नातूच निघाला. शांताराम जाधव या 24 वर्षीय आरोपीला पकडून चौकशी केली असता दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याने आजीला मारल्याची त्याने कबुली दिली.