Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक२० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली

election
, बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (08:32 IST)
राज्यभरात सध्या गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. पाणी पुरवटा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या तिन्ही दिग्गजांनी या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ठाण मांडले आहे. या तिन्ही नेत्यांकडून एकमेकांवर विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक राज्यभरातच चर्चिली जात आहे. अशातच आता ही निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. निवडणूक पुढं ढकलण्यामागे मोठं राजकारण घडलं का? तसेच पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडणार का?, या दोन मुद्द्यांवर चर्चांचा बाजार मोठ्या प्रमाणात गरम झाला आहे.
 
निवडणूक चिन्ह वाटप
जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून चांगलाच राजकीय वातावरण तापले असतानाच आता या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम २० डिसेंबर पर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत मतदानाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत आता निवडणूकीचा पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले आहेत. जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला होता. मंगळवारी अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.
 
महत्त्वाची कारणे
जळगाव जिल्हा दूध संघाची १० डिसेंबर रोजी होणारी निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. राज्यात होऊ घातलेल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रमामुळे ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता २० डिसेंबरनंतर निवडणुकीची पुढील तारीख जाहीर होईल. दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता उमेदवारांना पुढील निवडणूक तारीख जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
 
काय आहेत शासनाचे आदेश?
राज्यात होऊ घातलेल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात वर्ग “क” वर्ग “ड” तसेच वर्ग “ई” प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक घेण्याचे प्रादेशिक केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असे राज्य शासनाचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचा देखील समावेश आहे. आता पुढची मतदानाची प्रक्रिया ही २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार होते. राज्य शासनाच्या आदेशामुळे आता निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवी सरस्वतीविषयी केलेल्या वक्तव्याबाबत छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले म्हणाले…