Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्याध्यापकाला एक हजारांची लाच घेताच एसीबीने ठोकल्या बेड्या

bribe
, बुधवार, 20 मार्च 2024 (09:18 IST)
शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांसाठी खर्चापोटी एक हजारांची लाच मागणार्‍या धुळे जिल्ह्यातील कुसूंबा येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापकांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. हा सापळा  यशस्वी करण्यात आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. प्रदीप पुंडलिक परदेशी (55, कुसूंबा, ता.धुळे) असे अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिक्षिका या सोशल अ‍ॅण्ड कल्चरल असोशिएशन, कुसुंबे ता.जि.धुळे संचलित आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी सर्व कार्यरत शिक्षकांकडून शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांपोटी प्रत्येकी एक हजार तर शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून आठशे रुपये मागितले होते मात्र त्यास तक्रारदार महिला शिक्षकेने विरोध दर्शवल्याने त्यांना हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करू देण्यास प्रतिबंध लावण्यात आला. महिला शिक्षिकेला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी दालनात एक हजारांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. धुळे तालुका पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंतिजसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेला कोणत्या जागा मिळण्याची शक्यता?