महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूकीचा निकाल जाहिर झाला आहे. विद्यापीठ अधिसभा व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणुक निकाल जाहिर केला. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अभिनंदन केले आहे. विविध अभ्यासमंडळासाठी उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु होती.
याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठ निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) राज्यातील सहा महसुल विभागात निवडणूक घेण्यात आली, यामध्ये मुंबई विभागातून डेरे राजेश चंद्रकांत, पुणे विभागातून गायकवाड सायबू लक्ष्मण, नाशिक विभागातून भाबड प्रदीप रामराव, औरंगाबाद विभागातून पवार बाळासाहेब शिवाजी, अमरावती विभागातून उबरहंडे राजेश्वर तुकाराम व नागपूर विभागातून दातारकर अभय निलकंठ हे उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत विद्यापरिषदेसाठी प्राचार्य गटात आयुर्वेद आणि युनानी विद्याशाखेतून कुलकर्णी माणिकराव हणमंतराव बिनविरोध तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतून पाथरीकर अनुपमा व्दारकादास व तत्सम विद्याशाखेतून ठाकूर ज्योती राजेश हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी प्राध्यापक वगळता शिक्षक गटात वैद्यकीय विद्याशाखेतून देवकर रविंद्र बळीराम, दंत विद्याशाखेतून जाधव प्रशांत दत्तात्रय, होमिओपॅथी विद्याशाखेतून ठाकरे भालचंद्र रामकृष्ण व तत्सम विद्याशाखेतून गिरी विश्रांती हे उमेदवार विजयी झाले आहे.
विद्यापीठ अधिसभेकरीता निवडणूक प्रक्रियेव्दारे राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नाशिक विभागात मतदान घेण्यात आले आहे यातून सहा प्राध्यापक निवडण्यात आले आहेत. याचबरोबर प्रत्येक विद्याशाखेतून एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम मतदान घेण्यात आले आहे. त्यातून अधिसभेकरीता पाच प्राध्यापक वगळता शिक्षक निवडण्यात आले आहेत. विद्यापीठ विद्यापरिषदेकरीता प्राचार्य व अधिष्ठाता यांच्यामधुन प्रत्येक विद्याशाखेमधून प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील प्राचार्य करीता मतदान घेण्यात आले आहे. प्रत्येक अभ्यासमंडळाकरीता सहा विभागप्रमुख याप्रमाणे 18 विविध (पदवी व पदव्युत्तर एकत्रित) अभ्यासमंडळाकरीता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी करीता निवडणूक घेण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळकारीता राज्यातील विविध 42 मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या निवडणूकीत एकूण 57.87 टक्के मतदान झाले आहे. विद्यापीठ अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राधापक वगळता शिक्षक गटाकरीता मतदान घेण्यात आले होते. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीसाठी एकूण 11742 उमेदवारांपैकी 6795 मतदारांनी मतदान केले होते. राज्यात सर्वाधिक मतदान वाशिम जिल्हयातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालयातील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्याचे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे 12.81 टक्के झाली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor