राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
आमदार सरनाईक यांच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खूप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोनाविरुद्ध करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. सरनाईक यांचे अभिनंदन केले.
तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा – पालकमंत्री
नगरविकास मंत्री शिंदे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वाधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.