पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे विभागीय आयुक्त कार्यलयाने आदेश दिले आहेत. सुलक्षणा शिलवंत-धर यांनी मास्क खरेदी मध्ये पती आणि भाऊ यांना सहभागी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नगरसेवक पदावर असताना कुटुंबातील सदस्यांना महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी करून लाभ मिळवल्या बद्दल शिवसेनेच्या जितेंद्र ननावरे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर कारवाई करत सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे तसेच घेतलेले सर्व लाभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांचे पती तसेच दोन भाऊ संचालक असलेल्या ॲडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना कालावधीत 10 लाखांचे मास्क पुरवले होते. यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली होती.