Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व झेडपीमध्ये ६ जूनला साजरा होणार हा दिन

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व झेडपीमध्ये ६ जूनला साजरा होणार हा दिन
, बुधवार, 2 जून 2021 (08:12 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
 
यासंदर्भातील निदेश ग्रामविकास विभागाने ०१ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. यानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
 
जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
 
मुश्रीफ म्हणाले की, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवने, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकुम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत