Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हत्येचा अवघ्या काही तासातच उलगडा; मोबाईल चार्जरच्या वायरने दाबला गळा

crime
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (09:03 IST)
नाशिक – पंचवटी परिसरातील मेरी सरकारी वसाहतीत झालेल्या लिपीकाच्या हत्येचा नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला आहे. संजय उर्फ संतु वसंतराव वायकांडे (वय ३८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वायकांडे हे मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी माहेरुन घरी परतल्यानंतर घरात पती मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. आणि आता याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
 
काय घडला होता प्रकार
राज्यातील धरणांची बांधणी, रचना आणि देखभालीसंबंधात कार्य करणारी महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेचे मुख्यालय पंचवटी परिसरातील मेरी येथे आहे. या संस्थेत कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी याचठिकाणी सरकारी निवासस्थान आहे. याच वसाहतीत वायकांडे हे राहत होते. वसाहतीमधील एका खोलीत पत्नी, दोन मुलांसह वायकंडे हे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास होते. दिपावलीनिमित्त त्यांची पत्नी आपल्या मुलांसोबत तीन दिवसांपुर्वी माहेरी गेली होती. मंगळवारी (३ नोव्हेंबर) जेव्हा त्यांची पत्नी घरी परतली, तेव्हा ते घरात मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
 
पोलिसांना संशय
शवविच्छेदनासाठी वायकांडे यांचा मृतदेह नेण्यात आला. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर काही व्रण आढळून आले. त्यामुळे गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला असावा? अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. घटनेची माहिती मिळताच रात्री पंचवटी पोलिसांसह आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी मेरी येथील त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. वायकंडे यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांकडून विचारपूस करण्यात आली.
 
याने केला खून
संशयित आरोपीचे नाव निवृत्ती हरी कोरडे (वय ५९, व्यवसाय- शेती, रा. लाखोटे मळा, इंदोरे, ता. दिंडोरी. जि. नाशिक) असे आहे. कोरडे हा मृत वायकांडे यांच्या मावशीचा पती म्हणजेच काका आहे. कोरडे हा घेवड्याच्या शेंगा विकण्यासाठी नाशकात आला होता. मात्र, रात्र झाल्याने तो वायकांडे याच्याकडे आला. त्यानंतर दोघांनी एकत्रित जेवण केले. दोघेही दारु प्यायले. त्यानंतर कोरडे याने वायकांडे याच्याकडे थकीत २ हजार रुपयांची मागणी केली. त्यावंतर दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यात कोरडे आणखी संतप्त झाला. त्यानंतर वायकांडे हा झोपी गेला. ही संधी साधत कोरडे याने वायकांडे याचा गळा मोबाईल चार्जरच्या वायरने दाबला आणि त्याचा खून केला. त्यानंतर सकाळी ७ वाजता कोरडे हा आपल्या शेतावर निघून गेला. पोलिसांनी कोरडे याला अटक केली असून त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता