Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिसांच्या बदल्या आणि बढतींना मुहुर्त; या कालावधीत होणार

Maharashtra Police
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (08:02 IST)
मुंबई – बदली आणि बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. दिवाळीनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीला मान्यता मिळणार आहे. परंतु सध्या केवळ वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक या पदाच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात येणार नाहीत. मात्र या पदाच्या समक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या केवळ परिक्षेत्र व आयुक्त कार्यालयाच्या क्षेत्रातच करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते.
 
शासकीय नोकरी म्हटली की बदली ही आलीच, शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या दर तीन ते पाच वर्षांनी बदल्या होत असतात. अनेक वेळा काही कारणामुळे वर्षभरानंतरही बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या यंदा मार्च एप्रिल महिन्यात होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या लांबल्या. तसेच बढती देखील झाली नाही. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्याने बदली प्रकरण आणखीनच रखडले. आता यास मुहुर्त लाभला आहे.
 
वास्तविक पाहता काही अधिकाऱ्यांचा सेवाकाळ २०२१ मध्येच पूर्ण झाला असून ते वर्षभरापासून बदलीच्या आदेशाची वाट बघत आहे.
सुमारे दोन-तीन वर्षांपासून कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात झाल्या नव्हत्या, मात्र नंतरच्या काळात दोन वर्षात मार्च व एप्रिल ऐवजी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये काही प्रमाणात या बदल्या करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र या बदल्या मार्चमध्येच होतील, अशी शक्यता असताना बदल्यांचा कालावधी लांबत गेला. त्यातच सण उत्सव आले आणि मध्यंतरी महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आले. सध्या गृहमंत्री पदाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे आता तरी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकर होतील असे मानले जात आहे.
 
नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा बंदोबस्त संपला असून त्यानंतर आता दिवाळीचाही बंदोबस्त लागेल. परिणामी आता दिवाळीनंतरच बदल्यांची यादी काढली जाईल. असे सांगण्यात येते. परंतु कदाचित गृहमंत्री फडणवीस हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीने करू शकतात. विशेषतः वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेचच होतील, मात्र मध्यम स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या त्या कार्यक्षेत्रातच होणार असल्याची समजते. त्याचप्रमाणे विनंती बदल्या आणि बढती होण्याची देखील शक्यता आहे. विशेषतः वादग्रस्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली सोयीच्या ठिकाणी होणार असून त्यांना बढती देखील मिळणार असल्याचे सांगण्यात येते. काही कारण असो, मात्र पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष बदल्यांकडे लागले आहे, असे दिसून येते.

Edited By - Ratandeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rahul Gandhi Pushup : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी पुशअप करताना दिसले