एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे 'बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये' रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी केले.
नाशिकच्या एकलहरे, औष्णिक विद्युत केंद्र येथे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा व विद्युत निरीक्षक विभागाची आढावा काल संध्याकाळी (12 मे, 2022) राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे, महाजनकोचे कार्यकारी संचालक आर. जी. मोराळे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता एन. एम. शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता डी. ए. कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, विद्युत निरीक्षक बी. के. उगले व तीनही कंपन्यांचे अभियंते व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळता येईल याचा विचार विजेची कामे करताना करा. तसेच पावसाळ्यापूर्वी थर्मल पावर स्टेशन कार्यान्वित करा. वीज प्रकल्प येथील राखेला मागणी असून नियमानुसार राखेचे वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच एकलहरेतील मंजूर 660 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत लवकरच सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले . यावेळी त्यांनी वीज निर्मिती केंद्राची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.