नाशिक : आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांच्या नियुक्तीवर आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे. आदिवासी विकास विभाग आयुक्त पदी धनगर समाजाच्या नयना गुंडे यांना हटवा अशी मागणी या आधीही आदिवासी समाजाकडून करण्यात आली होती. दरम्यान आता या निवडी विरोधात राज्यभरातून आदिवासी समाजातील नागरिक नागपूरकडे रवाना होणार असून उद्या नागपूर मध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
आक्रमक आदिवासींची नयना गुंडे यांना आयुक्त पदावरून त्वरित हटवण्याची प्रमुख मागणी आहे. तसेच बोगस आदिवासी यांना दिलेले संरक्षण देखील काढण्यात यावे अशा दोन प्रमुख मागण्यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झालेली आहे. या आंदोलनासाठी नाशिक मधून देखील हजारो नागरिक नागपूरकडे रवाना होत असून आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जाधव यांनी ही माहिती दिली आहे.
अधिसंख्य बोगस आदिवासींना खरे आदिवासी करण्यासाठी व धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्यासाठी धनगर जातीच्या नयना गुंडे यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील आयुक्त व आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक येथील आयुक्त पदी निवड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच ही निवड तत्काळ रद्द करा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केली होती.
धनगर जातीला आदिवासींचे आरक्षण मिळावे यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (trti) येथील आयुक्त राजेंद्र भारूड यांना ट्रेनिंग च्या नावाखाली सक्तीच्या एक महिन्याच्या रजेवर पाठवून बोगस आदिवासी खरे आदिवासी असल्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात व केंद्र सरकारला पाठविण्यासाठी अणि धनगर व धनगड एकच असून त्यामुळे धनगरांना आदिवासींच आरक्षण देण्यासंदर्भातचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात व केंद्र सरकारला पाठविण्यासाठी धनगर जातीच्या असलेल्या नयना गुंडे यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील आयुक्त पदाची व आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक येथील आयुक्त पदाची जबाबदारी देऊन आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय केल्याचा आरोप लकी जाधव यांनी या आधीच केला होता.
धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देऊ नये याची मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात आली आहे. त्यात आता आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांची सव्वा दोन वर्षातच या पदावरून बदली झाली. त्यांच्या रिक्त जागेवर गोंदीयाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची आदिवासी आयुक्त, नाशिक म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीवरही आदिवासी समाजाने आक्षेप घेत आता आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातून आदिवासी समाजातील नागरिक नागपूरकडे रवाना होणार असून उद्या नागपूर मध्ये भव्य मोर्चा काढण्यात येत आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor