बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची दिशा थेट महाराष्ट्रावर नसल्याने त्याचा राज्याच्या दृष्टीने प्रभाव क्षीण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांच्या काळात मध्यम स्वरूपाचा, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, सुमारे १५ दिवसांपासून थांबलेल्या परतीच्या पावसाच्या प्रवासाला सध्या चालना मिळाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरला दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा आहे. २२ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा पुन्हा निर्माण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हा पट्टा देशाच्या वायव्य आणि नंतर ईशान्य भागात वळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने त्याचा प्रभाव क्षीण ठरणार आहे.