Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे मुलाखत: कोणती उत्तरं मिळाली, कोणती नाही?

uddhav thackeray
, शुक्रवार, 28 जुलै 2023 (07:21 IST)
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीकडे अनेक जण, विशेषत: त्यांचे राजकीय विरोधक, फिक्स्ड मॅच म्हणून पाहतात.
आपल्याच पक्षाच्या खासदारांनी आपल्याच पक्षप्रमुखांची स्वत:च्या मुखपत्रासाठी घेतलेली मुलाखत. त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का?
 
पण हेतू स्पष्ट राजकीय आहे. ही मुलाखत म्हणजे सद्य राजकीय स्थितीवर ठाकरेंची विविध प्रश्नांवर भूमिका काय आहे, हे सांगण्याचा शिवसेनेचा मार्ग आहे. अशी मुलाखती बाळासाहेब ठाकरेही त्यांच्याच 'सामना'ला द्यायचे.
 
त्यामुळे जरी इतर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीसारखे कठीण प्रश्नांची इथं अपेक्षा करता येऊ शकत नसले तरीही सध्याच्या राजकीय प्रश्नांवरची उत्तरं तरी मिळाली आहेत का, हे पाहावं लागतं.
 
'सर्वांत मोठी आणि प्रखर मुलाखत' अशी या मुलाखतीची ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीरात केली असली तरीही उद्धव ठाकरे यांनी कोणती नवी भूमिका घेतली, नवा गौप्यस्फोट केला असं झालं नाही.
 
गेले काही दिवस जे उद्धव त्यांच्या सभा-संमेलनांमधून, पत्रकार परिषदांमधून जी उत्तरं देत आहेत, बहुतांशी तीच उत्तर या मुलाखतीत परत मिळतात.
 
एकंदरीत या संपूर्ण मुलाखतीचा रोख भाजपाविरोधी आहे. उद्धव यांनी आपला मुख्य राजकीय आणि वैचारिक प्रतिस्पर्धी हा भाजपाच आहे आणि ते कॉंग्रेसच्या अधिकाधिक जवळ येत आहेत हे स्पष्ट आहे.
 
'उद्धव यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला' आहे या भाजपाकडून वारंवार होणाऱ्या आरोपाला उत्तर त्यांना याही मुलाखतीत द्यावंच लागतं, पण लोकशाही आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर ते पुन्हा एकदा ते आपल्या जुन्या मित्रपक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात.
 
अजित पवार, राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर अशा अनेकांविषयी उद्धव यांनी भाष्य केलं. पण तरीही सद्य राजकीय स्थितीमध्ये असेही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं येतील म्हणून या मुलाखतीकडे लक्ष होतं. पण ती स्पष्ट मिळाली नाहीत.
 
शरद पवारांबद्दलची भूमिका
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यावर अद्यापही उद्धव ठाकरे त्यावर विस्तारानं बोलले नाही आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मोठा निर्णय उद्धव यांनी घेतला होता. या नव्या राजकीय समीकरणात पवारांची सगळ्यांत महत्त्वाची भूमिका होती.
 
पण आता अजित पवार बाहेर पडल्यावर त्यांनी जाहीरपणेच सांगितले की 2018 पासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी अनेकदा चर्चा केली होती.
 
याचा अर्थ असा होतो की जेव्हा उद्धव भाजपाशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादीसोबत गेल्यावरही पवार आणि भाजपाची चर्चा झाली होती. इथे प्रश्न विश्वासाचा बनतो. त्यामुळे जो विश्वास ठाकरे आणि पवारांमध्ये नव्या आघाडीमुळे तयार होत होता, त्यावर या खुलाशांनंतर उद्धव यांची भूमिका काय आहे?
 
उद्धव 'भाजपा पक्ष चोरुन नेते आहे आणि राष्ट्रवादी त्याचं दुसरं उदाहरण आहे' या पलिकडे जाहीर भाषणांमधूनही काही बोलले नाही आहेत.
 
राष्ट्रवादी फुटल्यावरही उद्धव आणि शरद पवार यांची केवळ एकदा, बंगळुरुच्या विरोधकांच्या बैठकीत, भेट झाली आहे. तिथेही पवार एकच दिवस गेले. तेव्हा ठाकरे आणि पवार यांच्यात स्वतंत्र काही बोलणी झाली का हे जाहीर नाही.
 
बंडानंतर उद्धव यांचा फोन आला होता हे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, पण उद्धव यांच्या बाजूनं काहीही सांगण्यात आलं नाही. उद्धव अधिवेशन काळात अजित पवारांना मात्र जाऊन भेटले.
 
एका बाजूला त्यांनी मुलाखतीत अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक केलं, मात्र दुसरीकडे त्यांनी शरद पवारांचं वय काढलं हे आपल्याला पटलं नाही म्हणून अजित पवारांना कानपिचक्याही दिल्या. उद्धव यांचा यात काही राजकीय मेसेज आहे का?
 
शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातल्या पद्धतीवर टीकाही केली. त्यावरही या मुलाखतीत उद्धव बोलले नाहीत.
 
संजय राऊत यांनी शरद पवारांवर चर्चा आणण्यासाठी दोन-तीन प्रश्न विचारले, पण उद्धव ठाकरे विस्तारानं बोलले नाहीत.
 
शिवसेना फुटली तेव्हा उद्धव यांनी जसा सगळ्या पातळ्यांवर लढाई सुरु केली तशी शरद पवार त्यांच्या पक्षफुटीनंतर का करत नाहीत असं विचारल्यावर 'त्यांची पद्धत वेगळी असेल' अशा आशयाची छोटी टिपण्णी करुन उद्धव पुढे गेले. ते शरद पवारांवर विस्तारानं का बोलले नाहीत?
 
राज ठाकरे
गेल्या काही दिवसात जी सर्वांत खमंगपणे केली गेलेली चर्चा आहे, जी खरं तर गेल्या दीड दशकापासून महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात होतेच आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का?
 
शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोरचा संघर्ष, पक्षांच्या फुटाफुटीमुळे मतदारांना हवा असणारा नवा पर्याय, अजित पवार महायुतीत गेल्यानं तिथं मनसेसाठी कमी झालेली जागा, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या.
 
उद्धव ठाकरेंनी इतके दिवस याबाबतची चर्चा टाळली होती. पण संजय राऊतांनी हा प्रश्न त्यांना विचारला. पण उद्धव ठाकरेंनी त्यावर नेमकं उत्तर दिलं नाही. अशा चर्चा सुरु झाल्या, पण त्यात खरंच काही तथ्य असतं तर त्या अशा बंद झाल्या असत्या का, अशा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
 
'मी सध्या समोर जे चालू आहे त्यावर विचार करतो' असं म्हणून त्यांनी आता तरी या शक्यतेत काही दम नाही हे सांगितलं, पण पुढे होऊ शकेल किंवा नाही यावर ते काहीही बोलले नाहीत.
 
म्हणजे दोन भाऊ एकत्र भविष्यात एकत्र येऊ शकतात का? उद्धव ठाकरे ती शक्यता भविष्यात गृहित धरत आहेत का? राजकारणात कधी कधी संदिग्धता हेही हत्यार असतं. तेच इथं वापरलं जात आहे का?
 
पण हे नक्की की राज ठाकरेंसोबतच्या एकत्र येण्यावर उद्धव यांनी कोणतीही स्पष्टता या मुलाखतीत दिलेली नाही.
 
बंडखोरांची घरवापसी
हा एक अजून मुद्दा होता ज्याबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून गेलं वर्षभर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत.
 
संजय राऊतांपासून अंबादास दानवेंपर्यंत अनेकांनी असं वारंवार म्हटलं आहे की एकनाथ शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते परत येऊ इच्छितात.
 
शिवाय सध्याच्या राजकीय स्थितीत अजित पवार सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाचं महत्त्व कमी झालं आहे आणि त्यामुळे त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत, म्हणून ते परत येण्याच्या मनस्थितीत आहे, असं म्हटलं जातं आहे. त्यात शिंदेंच्या अस्थिर मुख्यमंत्रिपदावरुनही चर्चा सुरुच असते. पण खरंच आमदार घरवापसी करणार आहेत का?
 
उद्धव ठाकरे जर त्याबद्दल बोलतील तर या चर्चांना गांभीर्य येईल. पण ते स्वत: जाहीर काहीही बोलले नाही आहेत ना कोणती प्रतिक्रिया दिली आहे.
 
या मुलाखतीत संजय राऊतांनी त्यांना जसे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार शरद पवारांना भेटायला गेले तसे शिवसेनेचे तुमच्याकडे येतील का, असं विचारल्यावर, 'ते तसं करणार नाहीत, माझा स्वभाव त्यांना माहिती आहे' असं छोटेखानी उत्तर ठाकरेंनी दिलं.
 
मग त्याचा अर्थ एका बाजूला अलिकडेच मनिषा कायंदे, नीलम गो-हे असे नेते शिंदेंच्या बाजूला जात असतांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काही इनकमिंग होणार नाही असा होतो का? कार्यकर्ते आपल्या बाजूला आहेत असा दावा ठाकरेंनी वारंवार केला आहे, पण या मुलाखतीत ते बंडखोरांबद्दल निवडक टीका वगळता जास्त बोलले नाहीत.
 
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आलं. या नव्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक. त्यामुळे आता जी परिस्थिती झाली आहे त्यात महाविकास आघाडीचे भवितव्य काय याबद्दल ठाकरे या मुलाखतीत फारसं स्पष्ट बोलत नाहीत.
 
वज्रमूठ सभा सुरु होत्या, त्या थांबल्या आहेत, त्यापरत सुरु होणार आहेत का? अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा मोठा आणि प्रभावशाली गट भाजपच्या जवळ गेला आहे. मग त्यानंतरही महाविकास आघाडी अजून आहे की नाही? जागावाटपाच्या चर्चा सुरु झालेल्या थांबल्या. मग त्याबद्दल निश्चित काही होणार आहे का?
 
'तिढा सोडवू' असं ठाकरे ठामपणे म्हणतात, पण कसा ते मात्र सांगत नाहीत. प्रकाश आंबेडकरांसारख्या नव्या मित्रांसोबत जी बोलणी सुरु झाली होती, ती प्रत्यक्ष कृतीपर्यंत पोहोचणार आहेत की नाही, याचं निश्चित उत्तर मिळत नाही.
 
उद्धव ठाकरे या सगळ्या प्रश्नांना हात घालतात, ते प्रश्न संजय राऊतही स्पष्टता येण्यासाठी परत विचारतात, पण तरीही शेवटाला संदिग्धता कायम राहते.



Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chinese girl Goes to Pak for Lover : चिनी महिला प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली