Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘असे भोंगेधारी, पुंगीधारी अनेक बघितले’ मुख्यमंत्री उद्धव यांची राज यांच्यावर कडाडून टीका

uddhav and raj thackeray
, सोमवार, 2 मे 2022 (07:31 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत आहे. तसेच, राज यांनी भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीर भाष्य केले आहे. उद्धव म्हणाले की, हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे आम्ही लक्ष देत नाही. कधी ते मराठीचा खेळ खेळतात तर कधी हिंदुत्वाचा. शिवसेना ही हिंदुत्ववादीच आहे. असे भोंगेधारी, पुंगीधारी अनेक बघितले, अशा कडक शब्दात उद्धव यांनी राज यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
 
दै. लोकसत्ताने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने कधी मराठीचा खेळ पाहिला तर कधी हिंदुत्वाचा. फुकटात करमणूक होत असेल तर का नाही हा खेळ पहायचा. हिंदुंना नासमज समजू नका. आपल्या देशात हिंदू हे अने भाषा बोलतात. आम्ही मराठी म्हणून बाकीच्यांना हाकलून द्यायचं. चाललं नाही की परत बोलवायचं. हे असले माकडचाळे लोकांना समजतात. हिंदू असल्याचं सांगावं लागत नाही. आम्ही कधीही झेंडा बदलला नाही. वेगवेगळे झेंडे का फडकावे लागत आहेत. अस्तित्व असलं तर ती टिकवण्याची गरज असते, अशा रोखटोक शब्दात उद्धव यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.
 
गेल्या काही वर्षात प्रथमच उद्धव यांनी राज यांच्यावर एवढी स्पष्ट आणि कडक शब्दात टीका केली आहे. राज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भोंग्यांच्या प्रश्नावरुन कौतुक केले. त्यासंदर्भातही उद्धव यांनी भाष्य केले. भोंग्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, भोंग्यांबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांना आणि सर्वधर्मियांना लागू आहे. उत्तर प्रदेशात भोंगे काढले महाराष्ट्रात का नाही, असे म्हणतात. उत्तर प्रदेशात कोरोनाच्या काळात नदीमध्ये प्रेतंही फेकली गेली. तेव्हा काम न करता हे करुन लोकप्रिय होणार असतील तर त्यांचं त्यांना लखलाभ आहे. न्यायालयाचे निकाल आणि आवाजाची मर्यादा सर्वांनाच पाळावी लागेल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक वोक्हार्ट हॉस्पिटलला दणका; कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल