उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचा 'मुख्यमंत्री' असा उल्लेख केल्याचं अजित पवारांचं विधान काल दिवसभर चर्चेत राहिलं. मात्र, नंतर अजित पवारांनी स्वत: यावर स्पष्टीकरण देत चर्चा थांबवली.
झालं असं की, पुण्यात कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीआधी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "नागरिकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरू केलीय. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील."
अनवाधनाने आपण आदित्य ठाकरेंनाचा 'मुख्यमंत्री' म्हटल्याचे अजित पवारांना लक्षात आलं नाही. त्यात आधीच उद्धव ठाकरेंच्या आजारापणामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या चर्चेत या विधानाची भर पडली.
मात्र, कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांनीच याबाबतचा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले, "मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्या ठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. आमच्यात तसा कोणताही गैरसमज नाही. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत."
अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं तरी राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्येही मात्र अजित पवारांच्या अनवाधनानं झालेल्या चुकीची खमंग चर्चा झाली.