केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतर राज्यात दुष्काल जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये. उद्धव ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले की “केंद्रीय पथक येऊन गेलं एक दीड-महिना झाला तुमच्या हातामध्ये काही पडलं ? हातात आली का मदत ? मग पथकाने केलं काय ? काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं ? अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुखाद्य तसेच पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर बीडमधल्या आशीर्वाद लॉन्स इथल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.
दैनिक सामानाने याबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे ते अंशत: देत आहोत. सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारला ‘खरं सांगा की किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे’किती जणांना मिळाला असा प्रश्न विचारला. एकाही शेतकऱ्याचा हात वर होत नाही असं पाहून ते म्हणाले की मी तुम्हाला कर्जमाफीचं सर्टीफिकेट मिळालेला शेतकरी दाखवतो. यावेळी मंचावर अंजनडोह इथल्या बाळासाहेब सोळुंके या शेतकऱ्याला पुढे आणण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सोळुंके यांना मिळालेला सर्टीफिकेट दाखवलं. उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यालाच प्रश्न विचारला की सर्टीफिकेट मिळालं पण कर्जमाफी झाली का ? यावर त्या शेतकऱ्याचं उत्तर नाही असं होतं. त्याचं उत्तर संपल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की “या अन्नदात्याला तुम्ही अशा पद्धतीने खोटं बोलून फसवताय ? खोट्या कर्जमाफीचे आकडे आमच्या तोंडावर फेकून तुम्ही आम्हाला सांगताय की कर्जमाफी झालीय म्हणून. का झाली नाही या शेतकऱ्याची कर्जमाफी ? अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं. सोळुंके पात्र ठरूनही त्यांची कर्जमाफी होत नाही. हे जर मी चिडून सरकारला जाब विचारला तर तुम्ही मला विचारणार की मी सरकारच्या विरोधात आहे? माझ्या शेतकऱ्याला पिडाल तर मी सरकारच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही”मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली, मात्र त्याचा खरोखर जनतेला फायदा झाला का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला विचारला. “देश बदल रहा है म्हणता हे तुमच्यासाठी ठीक आहे कारण तुम्ही रोज नवनव्या देशात जात असता त्यामुळे तुम्हाला वाटतं की देश बदल रहा है. तुमच्यासाठी देश बदलतोय मात्र माझ्या देशातील बांधवांची परिस्थिती बदलत नाहीये, त्यांचे राहणीमान, दु:ख, व्यथा,वेदना बदलत नाहीयेत.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.