राज्यांसाठी सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीचे दर शंभर रुपयांनी कमी केले आहेत. राज्यांना आता ही लस प्रतिडोस तीनशे रुपयांना उपलब्ध होणार आहे. यापूर्वी या लसीची राज्यांसाठी किंमत चारशे रुपये होती. आदर पुनावाला यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
लस उत्पादक कंपनी सिरम इंन्सिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस राज्यांना 400 रुपये तर, खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळेल असं सिरमने अधिकृत घोषणा केली होती. यानंतर हे दर जास्त असल्याची चर्चा सुरू झाली होती. केंद्राने देखील भारत बायोटेक व सिरमला लसीचे दर कमी करण्याची सूचना केली होती. दरम्यान आता राज्यांसाठी लसीची किंमत प्रतिडोस शंभर रुपयांनी कमी केली आहे.
आदर पुनावाला यांनी असे ट्वीट केले आहे की, राज्यांसाठी लसीचा दर प्रतिडोस 400 रुपये वरुन 300 रुपये केला जात आहे. हा निर्णय तात्काळ लगेच लागू होईल. यामुळे राज्यांचा मोठा निधी बचत होईल. तसेच, लसीकरण कार्यक्रमाला वेग येईल व अनेकांचे प्राण वाचतील.
दरम्यान, महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, लसीच्या उपलब्धते अभावी एक तारखेपासून सुरू होणारे लसीकरण काही दिवसांसाठी लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.