श्री काळाराम संस्थानतर्फेनाशिक ६ ते १0 एप्रिलदरम्यान वासंतिक नवरात्रोत्सव होणार आहे. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दोन वर्षाच्या व्यत्ययानंतर यंदा रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराचा वासंतिक नवरात्र उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. चैत्र शुद्ध नवमीला होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पंचवटीतील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनामाचा जयघोष होणार आहे. श्री काळाराम मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून जन्मोत्सवाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा मंदिराच्या गाभार्या पासून मंदिराच्या कळसापर्यंत संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली.. फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने मंदिराच्या चहूबाजूंनी मंदिर स्वच्छ धुण्यात आले असून उत्सवापूर्वी मंदिर आतून-बाहेरून स्वच्छ करण्याची वर्षानुवर्षांची ही परंपरा आजही बघायला मिळते.
नाशिकला प्रभू श्रीरामाची भूमी म्हटले जाते. या पंचवटीत परिसरात श्रीरामांची अनेक मंदिरे आहेत. त्यातील श्री काळाराम मंदिरातील श्रीराम जन्मोत्सवाला अधिक महत्त्व आहे. वासंतिक नवरात्र उत्सवात मंदिरात पहाटेला काकड होईल. त्यानंतर काळारामाला अवभूत स्नान घालण्यात येईल. काळाराम मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील काळाराम मूर्तीच्या समोरील पडदा हटवून श्रीराम जन्माचा सोहळा भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.
येथेही रंगणार सोहळा
पंचवटीतील गोरेराम मंदिर, रामकुंडावरील अहिल्यादेवी मंदिर, तपोवनातील श्रीराम पर्णकुटी, रविवार कारंजा परिसरातील तेली गल्लीतील राम मंदिर, मुठे गल्लीतील राम मंदिर, भोसला मिलिटरी कॉलेजच्या आवारातील राम मंदिर, नाशिकरोडला मुक्तिधाम, टाकळी मठ व परिसरातील बिर्ला मंदिर, तसेच वाल्मीकनगर येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
कपालेश्वर येथील वाद्य पथक, नगारा, पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे यांचा मंदिरात गजर सुरू होईल. काळाराम मंदिराचा परिसर रांगोळ्या काढून सजविण्यात येणार आहे. सुवासिनी पारंपरिक वेशभूषा करून श्रीरामचा पाळणा सादर करतील. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.