Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन

death
, गुरूवार, 25 जुलै 2024 (09:35 IST)
ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.
 
मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी गुरुवारी (25 जुलै) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
 
दिब्रिटो यांचं मराठी साहित्य आणि पर्यावरण चळवळीमध्ये मोलाचं योगदान राहिलं आहे.
 
धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिब्रिटो अध्यक्ष होते.
 
4 डिसेंबर 1943 रोजी वसईमधील वटार गावात फादर फ्रान्सिस दिब्रिटो (मूळ नाव जॉन) यांचा जन्म झाला.
 
त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव दिब्रित असे होते, त्याचेच रूपांतर दिब्रिटो असे झाले.
 
फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आईचे नाव सांतान आणि वडिलांचे नाव लॉरेन्स असे होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला.
 
त्यासाठी 1962 साली त्यांनी गोरेगाव इथल्या सेमिनरीमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
 
10 वर्षे विविध विषयांचं शिक्षण घेतल्यानंतर ते 1972 साली धर्मगुरू झाले. त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये येणं-जाणं सुरू झालं.
 
वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांची आणि त्यांच्या प्रश्नांची त्यांच्याशी ओळख झाली.
 
मराठी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांची पत्रं आणि ललित लेख याद्वारे त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती.
 
1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. 1979 साली ते रोममधल्या रोस्सा इथल्या कॉलिजियो दि सान पावलो या सेमिनरीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले.
 
रोममधल्या शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर पोप जॉन पॉल यांचा मोठा प्रभाव पडला. पोप यांच्यासह मदत तेरेसा यांना भेटताही आलं.
 
दरम्यान, त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात BA तर धर्मशास्त्रात MA केलं.
 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी आणि त्यासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे.
 
पालघर जिल्ह्यातील परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बजेटमधल्या ‘या’ तरतुदीमुळे घर विकताना तुम्हाला भरावा लागू शकतो जास्त टॅक्स, जाणून घ्या