राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा व जोरदार वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी कमी झाली असून हवामानात मोठे बदल होत आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्य़ात आला आहे. त्याच प्रमाणे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.राज्यात 29, 30 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुंबई- ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.