Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहणार - खा. शरद पवार

आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहणार - खा. शरद पवार
, गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:40 IST)
भाजपा शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे, त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
 
यावेळी देश आणि राज्यातील विविध घडामोडींवर पवार यांनी भाष्य केले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रातून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक शेतकऱ्यांनी वीमा काढला आहे पण विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळे सरकारने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना कंपन्यांना द्याव्यात, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.
 
काल दिल्लीमध्ये पोलिसांना वाईट वागणूक मिळाली. युनिफॉर्म मध्ये असतानाही पोलिसाला मारहाण झाली, पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्यापद्धतीने वाढत आहे, त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. संपूर्ण देशात पोलिसांची परिस्थिती हलाखीची आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अशारितीने मनोबल खच्ची झाले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी टिप्पणी पवार यांनी केली. दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
 
लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या निकाल अपेक्षित आहे. निकाल लागल्यानंतर समाजातील कोणत्याही घटकाने हा निकाल आपल्याविरोधात लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्वीकारावा, निकाल काहीही लागला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये, जी परिस्थिती १९९२ साली उद्भवली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील,  मुख्य प्रवक्ते आ. नवाब मलिक, राष्ट्रीय सरचिटणीस आ.जितेंद्र आव्हाड  आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागरिकांनो तुम्हीच सांगा कसे कांद्याचे भाव कमी करायचे ते