मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. राज्यात चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अद्यापही मान्सून लांबणीवर आहे. पण हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट येईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच मान्सूनचं मुंबईत आगमन होणार आहे. यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून आता येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत हजेरी लावणार, असंही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातमधून राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुढे सरकले असले, तरी गुजरातमधील त्याची तीव्रता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून विविध जिल्ह्यांत सुसाट वारे वाहत आहेत. अर्थात, अजून काही दिवस असेच वारे वाहात राहणार आहेत आणि २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. यामुळे जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.