Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कोणते निर्बंध लागू आहेत? होम आयसोलेशनसाठीच्या गाईडलाईन्स काय आहेत?

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कोणते निर्बंध लागू आहेत? होम आयसोलेशनसाठीच्या गाईडलाईन्स काय आहेत?
, बुधवार, 5 जानेवारी 2022 (22:17 IST)
सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची गरज नाही मात्र गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
राजेश टोपे याबद्दल बोलताना म्हणाले, "नव्या रूग्णांसाठी क्वारंटाईन पिरीयड सात दिवसाचा करणार. 90% लोकांमध्ये लक्षणं नाहीत. पण वाढती रूग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे.
अँटीजेन टेस्ट केली तर RT-PCR टेस्ट करण्याची गरज नाही. सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागतील."
 
होम आयसोलेशनसाठीच्या नवीन गाईडलाईन्स
केंद्रसरकारने आयसोलेशनसाठीच्या नवीन गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत.
 
टेस्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर सात दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसेल तर होम आयसोलेशननध्ये असलेला रुग्ण डिस्चार्ज धरला जाईल.
होम आयसोलेशन संपल्यानंतर पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही.
रुग्णांच्या कुटुंबीयांना लक्षणं नसतील तर टेस्ट करणं गरजेचं नाही. घरी आरोग्य तपासणी करावी.
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी टृीपल लेअर मास्क सतत घालून ठेवावा.
आठ तासांनी मास्क बदलावा. मास्क 72 तास एका पेपरमध्ये बांधून ठेवावा. मग फेकून द्यावा.
रुग्णाने हवा खेळती राहील अशा रूममध्ये रहावं.
रुग्णाच्या वस्तूला कोणीही हात लावू नये.
रुग्णाने शरीरातील ऑक्सिजन चाचणी (SPO2) करावी.
रुग्णांनी घरी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात किंवा तीन वेळा दिवसातून वाफ घ्यावी.
ताप उतरत नसेल तर डॅाक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून चार वेळा पॅरेसेटिमॅाल 650 mg ची गोळी घ्यावी.
डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय चेस्ट X रे, रक्ततपासणी आणि CT scan करू नका. स्वतःवर औषधाचे प्रयोग करु नका.
पुण्यामध्ये कोणते निर्बंध आहेत?
"माझी पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका," असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी 4 जानेवारीला पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
 
अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे-
 
पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
दोन डोस असेल तरच हॉटेल, सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल.
नियमांचं तंतोतंत पालन सर्वांनी करावे.
10 तारखेपासून आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार
पुणे जिल्ह्यात हॉटेल, मॉल अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी 2 डोस घेतले नसतील तर प्रवेश देण्यात येणार नाही.
पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 74 टक्के नागरिकांनीच लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे.
मुंबईतले निर्बंध काय आहेत?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विशिष्ट इमारतीतल्या 20 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असेल तर संबंधित इमारत किंवा विंग सील करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांनी होम आयसोलेशनचे नियम कसोशीने पाळावेत असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर रुग्णाने 10 दिवस विलगीकरणात राहावं.
कोणतीही लक्षणं नसतील पण चाचणी पॉझिटिव्ह असेल तर 3 दिवस विलगीकरणात राहावं. हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी 7 दिवस घरी विलगीकरणात राहावं. पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांनी चाचणी करावी. चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी रुग्णांसाठीच्या नियमांचं पालन करावं.
 
इमारतीच्या कार्यकारिणी समितीने कोरोना रुग्णांना अन्न, औषधं आणि जीवनापयोगी वस्तू पुरवाव्यात. कोरोना नियमावलीचं पालन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड वॉर रुम कर्मचारी यांना सहकार्य करावं असं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
 
इमारत डीसील करण्याचा निर्णय वॉर्ड पातळीवर घेतला जाईल. कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यास वॉर्ड वॉर रुमशी संपर्क करावा.
 
मंगळवारपासून (4 जानेवारी) हे नियम लागू करण्यात येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.
 
'कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जानेवारीत 2 लाख केसेस येऊ शकतील', असं राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्य़ा पत्रात म्हटलं आहे.
 
प्रदीप व्यास आपल्या पत्रात म्हणतात, "ओमिक्रॉन सौम्य आहे असं समजू नका, लस न घेतलेल्यांसाठी आणि सहव्याधी असलेल्यांसाठी हा व्हेरिएंट जीवघेणा आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनासंसर्ग खूप मोठा असेल आणि केसेस जास्त असतील, त्यामुळे लसीकरण मोहीम वाढवा आणि जीव वाचवा"
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळत आहे.आज मुंबई महानगर क्षेत्रात 5631 नवे रुग्ण आढळले आहेत.
 
या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विविध प्रकारची पावलं उचलली जात आहेत. त्यानुसार राज्यात वेगवेगळे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
 
गुरुवारी (30 डिसेंबर) रात्री राज्य सरकारनं काही नवे निर्बंध लागू केले आहेत. 2021 च्या अखेरच्या दिवसापासून म्हणजे शुक्रवारी 31 डिसेंबरपासून राज्यात हे नवे निर्बंध लागू झाले आहेत.
 
या नव्या निर्बंधांमध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यांसाठीची उपस्थितीची मर्यादा ठरवण्यात आली आहे. यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह आता हे नवे निर्बंध कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.
 
महाराष्ट्रासाठीचे निर्बंध
विवाह सोहळ्यांमध्ये उपस्थितांची संख्या ही 50 एवढी मर्यादीत करण्यात आली आहे. लग्न बंद हॉलमध्ये असेल किंवा खुल्या मैदानात असेल तरीही ही मर्यादा कायम राहणार आहे. यापूर्वी बंदिस्त सभागृहांसाठी ही मर्यादा 100 आणि खुल्या जागेसाठी 250 इतकी होती.
त्याशिवाय इतर कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक सोहळे असतील तर त्यासाठीदेखील उपस्थितांच्या संख्येची मर्यादा ही 50 एवढीच मर्यादीत ठेवण्यात आली आहे.
अंत्यसंस्काराच्या सोहळ्यासाठी उपस्थितांच्या संख्येची मर्यादा आणखी कमी करण्यात आली असून अंत्यविधीला केवळ 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.
त्याशिवाय इतर ठिकाणांसाठी यापूर्वी जाहीर केलेले निर्बंध कायम राहणार आहेत. ते 25 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. यामध्ये...
 
संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 20 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
या नियमांचं उल्लंघन झाल्यास महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 
याशिवाय राज्यामध्ये विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रशासनाला आवश्यक वाटत असतील त्यानुसार काही निर्बंध लावता येणार आहेत.
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरज नसताना घराबाहेरग, गर्दीमध्ये जाणं टाळावं अशा सूचना वारंवार प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले : नाना पटोले