Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगली कुणाची फडणवीसांची की पवारांची? आऊट कोण झालंय?

devendra ajit panwar
, शुक्रवार, 30 जून 2023 (14:45 IST)
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेचं बिनसलं. यानंतर, शिवसेनेने भाजपसोबतची निवडणूकपूर्व युती मोडून महाविकास आघाडीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याचं निश्चित झालं.
पण, याच वेळी अचानक एके दिवशी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं.
 
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात या घटनेने मोठी खळबळ माजल्याचं दिसून आलं. या घटनाक्रमाबाबत विविध पुस्तके आली. विविध राजकीय विश्लेषकांनी या घटनेचं आपल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे.
 
पण, शपथविधी नेमका कसा घेतला? यामागे कुणाची खेळी होती? याबाबत लोकांच्या मनात अद्याप संभ्रम आहे. अजूनही या प्रकरणातील सत्य नेमकं काय, याविषयी स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही
 
सरकार स्थापण्याचे आपले डावपेच फसल्यानंतर फडणवीसांनी त्यावेळी योग्य वेळ आल्यानंतर आपण यावर प्रतिक्रिया देऊ, असं म्हटलेलं होतं.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांसह अजित पवारांनी या विषयावर मौन बाळगणंच पसंत केलेलं होतं. परंतु, शरद पवारांनी जवळपास साडेतीन वर्षांनंतर या बाबतचं मौन अखेर सोडलं आहे.
 
‘डबल गेम’ केल्याच्या फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना ती आपली एक खेळी होती, असं पवार म्हणाले. इतकंच नव्हे तर मी टाकलेल्या गुगलीवर फडणवीस बाद झाले, असंही पवारांनी म्हटलं.
 
तर, शरद पवारांची ही प्रतिक्रिया म्हणजे अर्धं सत्य असून पुढील काळात या प्रकरणातील पूर्ण सत्य बाहेर आणू, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या विषयावरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी सुरू होती.
 
कधी 1978 सालचं पुलोद सरकार तर कधी सध्याच्या राज्य सरकारच्या कारभारावरून दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
 
या पार्श्वभूमीवर, काल दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हा याच नाट्याचा पुढचा अंक होता. या निमित्ताने आपणच गुगली टाकून समोरच्यास कोंडीत पकडल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे.
 
‘मिस्ट्री शोधण्यासाठी पवारांची हिस्टरी पाहायला हवी’
सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसह डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांनी बातम्यांमध्ये स्थान मिळवलं.
 
रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना पहाटेच्या शपथविधी आणि शरद पवारांचं त्याच्याशी कनेक्शन यांचं गूढ नेमकं काय, असा प्रश्न विचारण्यात आला.
 
त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिस्टरी’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल.”
 
मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर येऊ शकते, असं त्यांच्याच काही लोकांनी आम्हाला सांगितलं.”
 
“यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली,” असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.
 
‘किंगमेकर नव्हे किंगब्रेकर’
शरद पवार यांनी 2019 साली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनवलं. तसंच देशाच्या राजकारणातही पवारांची प्रतिमा किंगमेकर म्हणून राहिलेली आहे, यावर तुमचं मत काय, असा प्रश्न फडणवीसांना डीडी न्यूजच्या मुलाखतीत विचारण्यात आला.
 
उत्तरादाखल फडणवीस म्हणाले, “मी असं म्हणेन की शरद पवार हे किंगमेकरपेक्षाही किंगब्रेकर जास्त आहेत. सरकार पाडण्यात ते अत्यंत पारंगत आहेत. ते एक अनुभवी नेते आहेत, त्यामुळे अशा गोष्टी ते नेहमी करत असतात.
 
रिपब्लिक न्यूज मुलाखतीत फडणवीस पुढे म्हणाले, “आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती,” असं फडणवीस यांनी म्हटलं.
 
‘खंजीर पवारांनी नव्हे तर ठाकरेंनी खुपसला’
या संपूर्ण प्रकरणात शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्नही फडणवीसांना विचारण्यात आला.
 
यावर ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी जे केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं.”
 
डीजी न्यूजवर बोलताना ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर आम्ही त्याचा वचपा काढणार होतो. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते समोरून आम्हाला ऑफर देत होते. तीन पक्षांचं सरकार बनावं असं आम्हाला वाटत नाही. स्थिर सरकार मिळण्यासाठी आम्हाला भाजपसोबत यायचं आहे, असं ते म्हणाले. यानंतर आम्ही चर्चा केली. शरद पवारांनीही त्याला सहमती दिली. त्यांच्या सहमतीनंतरच अजित पवार आणि आम्ही सगळ्या गोष्टी ठरवल्या. पण नंतर ते अचानक बाजूला झाले.
 
शरद पवार बाजूला झाल्यानंतरसुद्धा अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. म्हणून आम्ही शपथ घेतली. पण सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर अपात्र होण्याच्या भीतीने अजित पवारांचे समर्थक बाजूला सरकले. हा काही अपघात नव्हता. नियोजनबद्धरित्या केलेला एक डावपेच अपघाताप्रमाणे भासवण्यात आला, असं फडणवीस यांनी म्हटलं.
 
‘त्यांनी विकेट दिली तर का घ्यायची नाही?’
देवेंद्र फडणवीसांच्या या मुलाखतींमधील वक्तव्यांच्या संदर्भाने काल दिवसभर बातम्या सुरू होत्या. त्यामुळे निर्माण झालेलं वादळ शमवण्यासाठी शरद पवारांनी तडकाफडकी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.
 
पत्रकार परिषदेत पवारांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिलं, ते म्हणाले, “या प्रकरणातून तुम्हाला जो काही अर्थ काढायचा आहे तो काढा. हा डाव होता की नाही मला माहित नाही. माझे एक सासरे होते, त्यांचं नाव सदू शिंदे. ते गुगली बॉलर होते. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या."
 
"मी क्रिकेट खेळलो नव्हतो तरीही गुगली कसा टाकायचा मला माहित होतं. त्यामुळे त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे. अजित पवारांना नामुष्की सहन करावी लागली असं फडणवीस म्हणाले असतील, पण त्यांची विकेट गेली हे फडणवीस सांगत आहेत," असं पवार म्हणाले.
 
‘चर्चा झाली, पण तुम्ही का फसलात?’
पवार पुढे म्हणाले, “आम्ही फसवलं असं आता फडणवीस म्हणत आहेत. तर माझा त्यांना प्रश्न आहे की ते यामध्ये का फसले? उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला तर लगेच शपथ घ्यायला याल का?
 
“राज्यातील नेत्यांना सत्तेशिवाय करमत नव्हतं. सत्तेशिवाय त्यांची जी अस्वस्थता होती ती आम्ही लोकांसमोर आणली. आमच्या चर्चा सगळ्या झाल्या होत्या. त्यांना काहीही करुन आमची मदत हवी होती. चर्चा झाल्याशिवाय गोष्टी घडतात का,” असं पवार यांनी म्हटलं.
 
‘सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात’
ते पुढे म्हणाले, “मी दोन दिवसांत भूमिका बदलली तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांनी शपथ का घेतली? काय कारण होतं? शपथविधी चोरुन घेतली पहाटे? जर फडणवीसांना खात्री होती पाठिंबा नाही तर हे करायची आवश्यकता नव्हती.
 
“पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर जर आमचा पाठिंबा होता म्हणतात तर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार राहिलं का? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. याचा स्वच्छ अर्थ हा आहे की सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे समाजासमोर येण्यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या,” असं पवारांनी मान्य केलं.
 
अर्धं सत्य बाहेर आलं - फडणवीस
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत वरील वक्तव्ये केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ त्यावर प्रतिक्रिया दिली.
 
या प्रकरणातील सत्य पवार यांनी अखेर मान्य केलं आहे, मीच त्यांना गुगली टाकली होती, असं फडणवीस याबाबत म्हणाले.
 
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीसांनी म्हटलं, “शरद पवारांच्या तोंडी सत्य आलं, याचा मला आनंद आहे. मी सुद्धा गुगली टाकेल आणि उरलेलं सत्य बाहेर येईल.”
 
“माझ्या एका गुललीने एकतरी सत्य बाहेर आलं. थोडे-थोडे करून शरद पवारांच्या तोंडून सर्व सत्य बाहेर आणणार आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
 
दोघांचीही गुगली, मग आऊट कोण?
दोन्ही नेत्यांची वरील वक्तव्ये पाहिली तर 2019 च्या पहाटेच्या शपथविधी प्रकरणात आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न दोघांकडून सुरू आहे.
 
पण या माध्यमातून दोन्ही नेत्यांना नेमकं काय दर्शवायचं आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नेमकं कुणी कुणाची विकेट घेतली, अशी चर्चा याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे.
 
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगावात वाहनावर झाड पडल्याने दोन पोलिस ठार, तीन जखमी