Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात भाजपला सत्तेत येण्यासाठी ठाकरेंचीच गरज का लागते?

kamal 600
, शुक्रवार, 6 मे 2022 (08:30 IST)
गोष्ट 1996 सालची. कल्याण मतदारसंघाच्या जागेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी आग्रह धरला होता. पण ही जागा भाजपच्या ताब्यात असल्यानं लालकृष्ण अडवाणींनी ती देण्यासाठी नकार दिला.
 
त्यानंतर बाळासाहेबांनी 'कळमाबाईला धडा शिकवण्याची वेळ आली आहे,' असं वक्तव्य केलं. अडवाणी यांना याचा नेमका अर्थ कळला नाही. पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मात्र तो लगेच लक्षात आला.
 
त्यानंतर हे दोन्ही नेते मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेले. पण, तब्येत बरी नसल्याचं कारण देत बाळासाहेबांनी त्यांना भेटण्यास नकार दिला.
 
त्यानंतर अडवाणी बाळासाहेबांच्या भेटीसाठी आले. त्यांनाही तीन दिवस थांबवण्यात आलं.
 
तोवर अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान (13 दिवसांचं सरकार) झाले होते. वाजपेयी मातोश्रीवर आले, तेव्हा कुठं माझी तब्येत आता सुधारली आहे, असं म्हणत बाळासाहेबांनी त्यांना भेट दिली. बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला कशी अद्दल घडवली, याचा हा किस्सा त्यावेळी चांगलाच रंगल्याचं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी बीबीसीला सांगितलं.
 
पण हा किस्सा भाजपसाठी शिवसेना आणि ठाकरे कुटुंब किती महत्त्वाचं होतं ते दाखवून देतो.
 
महाराष्ट्रात आतापर्यंत दोनदा भाजप सत्तेत आलं आहे. पहिल्यांदा 1995 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2014 साली. या दोन्ही वेळेला भाजपला सत्तेत येण्यासाठी ठाकरे कुटुंबाची गरज पडली.
 
1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा, तर 2014 मध्ये उद्धव ठाकरेंचं समर्थन मिळाल्यानंतर भाजप सत्तेत आलं.
 
आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे कुटुंबीयातील राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात रान उठवलं आहे. सत्तेत येण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करू पाहत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
 
त्यामुळे मग महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी भाजपला ठाकरेंचीच गरज का लागते, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आधी भूतकाळात डोकावूया.
 
महाराष्ट्रात 1995 आणि 2014 साली कोणत्या परिस्थितीत भाजपनं राज्यात सत्ता स्थापन केली ते समजून घेऊया.
 
1995 ते 2019 : काय घडलं?
भाजप-शिवसेनेची पहिल्यांदा 1984 मध्ये युती झाली. पण, इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या लाटेत या युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर 1989 मध्ये पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र आले. यावेळी मात्र दोघांच्या जागांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.
 
1995 मध्ये भाजप-सेना युती सत्तेत आली. या निवडणुकीत शिवसेनेला 73 आणि भाजपला 65 जागा मिळाल्या.
 
या युतीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळालं.
 
पत्रकार आणि लेखिका सुजाता आनंदन यांनी 1980 पासून शिवसेनेच्या राजकीय प्रवासावर लिखाण करत आहेत.
 
त्यावेळच्या राजकीय परिस्थितीविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "1985 पर्यंत भाजप सोशालिझम फॉलो करत होतं. अडवाणी असो की वाजपेयी, पक्षाला कोणत्या दिशेला न्यायचं हे नेत्यांना कळत नव्हतं. त्यातच 1984 मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटशी संबंधित अतिरेक्यांनी इंग्लंडला बर्मिंगहॅम येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं अपहरण केलं. म्हात्रेंना सोडण्यासाठी दहशतवादी मकबूल भटच्या सुटकेची मागणी करण्यात आली. नंतर या अतिरेक्यांनी म्हात्रेंची हत्या केली.
 
"बाळासाहेब ठाकरे यांचं पहिल्यापासून 'मराठी माणूस' हे धोरण होतं. रवींद्र म्हात्रेंच्या हत्येनंतर ते उफाळून बाहेर आलं आणि मग ते मुस्लीमविरोधी व्हायला लागले, तसं बोलायला लागले. त्यांची हिंदूहृदयसम्राट अशी प्रतिमा निर्माण व्हायला लागली.
 
"1988-89 च्या दरम्यान भाजपनं राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला. तोवर बाळासाहेबांनी त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा निर्माण केली होती. त्यामुळे मग भाजपला ठाकरेंची गरज पडली."
 
पुढे 1999 पासून 2014 पर्यंत राज्यात आघाडीचं म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं.
 
2014 मध्ये मात्र संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदींचा करिश्मा आणि काँग्रेसविरोधी वातावरण यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी भाजपनं जास्तीच्या जागांची मागणी केली.
 
पण, शिवसेनेला ही मागणी मान्य नव्हती. त्यामुळे मग हे दोन्ही पक्ष आपली इतक्या वर्षांची युती तोडून एकमेकांविरोधात आणि स्वबळावर निवडणूक लढले.
 
निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सभागृहातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बहुमताचा आकडा खालावला. त्यामुळे राज्यात भाजपचं अल्पमतातलं सरकार सत्तेवर आलं.
 
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीमधलं सरकार महाराष्ट्रात दुसऱ्यांदा अस्तित्वात आलं.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना भाजपपेक्षाही कमी जागांवर लढली. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचा करिश्मा चालला आणि भाजपला देशात 300 हून अधिक जागा मिळाल्या.
 
त्यामुळे मग 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेनं भाजपशी युती केली. भाजप 164 तर शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढली. यात भाजपनं 105 तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या.
 
निकालानंतर सत्तेत समसमान वाटा आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद या मागणीवर शिवसेना ठाम राहिली. पण, मुख्यमंत्रीपदाबाबत कुठला शब्द दिला नव्हता, असं सांगत भाजपनं सेनेची मागणी फेटाळली. त्यानंतर मग शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.
 
जेव्हापासून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आहे, तेव्हापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाजपकडून सडकून टीका करण्यात येत आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत सत्तेत असल्यामुळे शिवसेना पूर्वीसारखी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेऊ शकत नाही, असं मत राजकीय विश्लेषकांच्या बोलण्यातून सातत्यानं समोर येतं आहे.
 
त्यामुळे मग आता हीच पोकळी भरून काढण्यासाठी ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.
 
राज ठाकरे यांच्या सभांदरम्यान त्यांचा 'हिंदू जननायक' असा केलेला उल्लेख किंवा बाळासाहेंबाप्रमाणे केलेला पेहराव याचंच निदर्शक आहे.
 
भाजपच्या नेत्यांकडूनही राज ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि भोंग्याविरोधी भूमिकेची पाठराखण केली जात आहे.
दुसरीकडे, सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिल्याची सल भाजपच्या मनात आहे, त्यामुळे भाजप आता राज ठाकरेंचा वापर करत असल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात.
 
यावेळी ठाकरेंची गरज फायदेशीर ठरणार?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राही भिडे यांच्या मते, "मराठी आणि हिंदुत्वाचा ठाकरे कुटुंब पहिल्यापासून उदोउदो करत आलं आहे. आमचं हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळं आहे, असंही ठाकरे म्हणतात. त्यामुळे मग हे वेगळं हिंदुत्व आणि मराठीचा लाभ मिळू शकतो, हे लक्षात ठेवून भाजपला ठाकरेंची गरज पडते.
 
"सध्या उद्धव ठाकरे दूर गेल्यामुळे भाजपनं राज ठाकरेंना जवळ केलं आहे. महाराष्ट्रात एकट्यानं सत्ता आणणं शक्य नाही, हे भाजपला ठाऊक आहे. म्हणून भाजपनं राज यांच्या मागे संपूर्ण ताकद लावली आहे. याचा कितपत फायदा होतो, ते भाजपला बघायचं आहे."
 
तर सुजाता आनंदन यांच्या मते, "महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय मतदार हा मंदिरात जाणारा आणि संस्कृती पाळणारा आहे. त्याकाळी हिंदुत्वाची प्रादेशिकवादाशी जोडणी केली, तर वजन वाढतं हे बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात आलं होतं. त्यांनी मग हिंदुत्व, प्रादेशिकवाद आणि मराठी माणूस यांची सांगड घातली. त्यामुळे मग भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी ठाकरे कुटुंबाची गरज पडते.
 
"आता सध्या भाजप त्यासाठी राज ठाकरेंचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. कारण राज ठाकरे बाळासाहेबांसारखे दिसतात, तसे बोलतात हे भाजपला ठाऊक आहे."
 
असं असलं तरी राज ठाकरे यांचा भाजपला कितपत फायदा होईल, याबाबत साशंक असल्याचं राही भिडे सांगतात.
 
त्या म्हणतात, "राज ठाकरे यांनी गेल्यावेळी शरद पवारांशी जुळवून घेतलं होतं आणि आता ते त्यांच्यावरच टीका करत आहेत. त्यामुळे राज यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. मुंबई महापालिकेतील त्यांचे नगरसेवकही कमी झाले आहेत. टोलनाक्याचा विषय असो की इतर विषय, धरसोडपणामुळे राज यांच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय.
 
"त्यामुळे भाजपला त्यांचा कितपत फायदा होईल, याबद्दल शंका आहे. पण, सध्या तरी भाजप याची ट्रायल घेऊन पाहत आहे."
दरम्यान, ठाकरे कुटुंबाला लाभलेल्या वलयामुळे भाजपला त्यांची गरज पडते, असंही मत शिवसेनेला जवळून बघणारे अभ्यासक नोंदवतात.
 
"महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबीयांच्या भोवती जे वलय आहे, जो करिश्मा आहे तो दुसऱ्या कोणत्याही नेत्याला नाहीये. याशिवाय महाराष्ट्रात भाजपकडे हिंदुत्ववादी चेहरा नाहीये. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील हे काही हिंदुत्वाचा चेहरा नाहीये.
 
"याशिवाय काही गोष्टी भाजप स्वत: न करता इतरांकडून करून घेण्याचं त्यांचं धोरण असतं. त्यामुळे कदाचित सध्या राज ठाकरेंचा ते वापर करत असावेत," असं एका राजकीय विश्लेषकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची लाट संपल्यानंतर लागू होणार CAA कायदा बंगालमध्ये ममता दीदींवर अमित शहांचा घणाघात