महाराष्ट्रात 11 जूनला मान्सूनचं आगमन झालं. पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जसे की मुंबई, ठाणे पुणे, नवी मुंबईत पाणी कपात लागू केलेली आहे.
पुणे शहरात 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर मुंबई आणि उपनगरीय भागांत 27 जूनपासून 10 टक्के पाणीकपात सुरू झालेली आहे.
पाणीकपातीमागे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेने अपुरा पाऊस आणि धरणांमधला खालवलेला पाणीसाठा ही कारणं दिली आहेत. पुणे शहरात 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे.
हा निर्णय जाहीर करताना पुणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं म्हटलं की, "यंदाचे वर्षी पाऊल खूप लांबल्याने, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधला पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. सद्यस्थितीत असणारा पाणीपुरवठा तसाच सुरू ठेवल्यास व पाऊस अजून लांबल्यास पुणे शहरास मिळणाऱ्या पाणीपुरवठ्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुणे शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे."
राज्यातल्या एकूण मोठ्या जलाशय प्रकल्पांमध्ये 4 जुलै 2022 रोजी 24.53% उपयुक्त पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच दिवशी 32.46% उपयुक्त पाणीसाठा होता. महाराष्ट्र जससंपदा विभागाने दिलेली आकडेवारी बघितल्यास असं दिसतं की पुणे विभागातल्या मोठ्या जलाशयांमधला उपयुक्त पाणीसाठा बाकी विभागांच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे. तो 12.2% टक्के एवढाच आहे. जो मागच्या वर्षी 27.72% एवढा होता.
पुणे शहराला मुख्यत्वे खडकवासला धरणसाखळीमधून पाणीपुरवठा होतो. यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर यांचा समावेश होतो. भामा आसखेड धरणातूनही शहरामध्ये पाणी पुरवठ्याला सुरुवात झालीये. पण धरणक्षेत्रातही कमी पाऊस झाल्याने धरणांमधला उपयुक्त पाणीसाठ्याचं प्रमाणही खालावतंय. मागच्या वर्षी याचदिवशी जितका पाणीसाठी या धरणांमध्ये उपलब्ध होता त्यापेक्षा कित्येक टक्क्यांनी यावर्षी पाण्याची पातळी खालावली आहे.
या धरणांमधली 4 जुलै रोजी असलेली वर्षनिहाय उपयुक्त पाण्याची आकडेवारी खालीलप्रमाणे.
खडकवासला
4 जुलै 2022- 27.74%
4 जुलै 2021- 39.85%
4 जुलै 2020- 53.78%
पानशेत
4 जुलै 2022- 11.38%
4 जुलै 2021- 39.59%
4 जुलै 2020- 21.15%
वरसगाव
4 जुलै 2022- 8.14%
4 जुलै 2021- 23.93%
4 जुलै 2020-14.23%
टेमघर
4 जुलै 2022- 0.29%
4 जुलै 2021- 16.08%
4 जुलै 2020- 4.28%
पुणे विभागात उजनी हे एक मोठं धरण आहे. तामध्ये सध्या शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
मुंबई महानगर क्षेत्राला 7 जलाशयांमधून पाणीपुरवठा करते. त्यामध्ये अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी यांचा समावेश होतो. कमी पाऊस आणि अपुऱ्या पाणीसाठ्यांमुळे 27 जूनपासून 10 टक्के पाणीकपात मुंबई महानगरपालिकेनं लागू केली आहे.
तानसा
29 जून 2022- 22.61%
मोडकसागर
28 जून 2022- 52.48%
मध्य वैतरणा
28 जून 2022- 8.68%
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजावरुन येत्या काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
"येत्या 5 दिवसांत राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. मंगळवारपासून म्हणजे 5 जुलैपासून पावसाचा जोर वाढेल," अशी माहीती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर दिली.