मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला, तर आई आणि 7 वर्षांची मोठी मुलगी दोरीच्या साहाय्याने बाहेर आली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून महिलेने हे पाऊल घेतल्याचे सांगितले जात आहे.
ही घटना टिकबर्डी फलिया गावात घडली. प्रमिला नावाच्या महिलेने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली. त्यानंतर महिला आणि तिची मोठी मुलगी विहिरीबाहेर बेशुद्धावस्थेत सापडले. ग्रामस्थांनी पाहताच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. विहिरीत बुडालेल्या इतर तीन मुलांना बाहेर काढले तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. मृत मुलांमध्ये 3-4 वर्षांच्या दोन मुली आणि दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
माहितीनुसार, घटनास्थळी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, प्रमिलाचा पती रमेशसोबत काही कारणावरून वाद झाल्याचे आढळून आले.
प्रमिलाला महुआ वेचून आणण्यासाठी शेतात जाण्यास सांगितले होते. त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. पण प्रमिला मुलांसोबत एवढं आत्मघातकी पाऊल उचलेल, याची कल्पनाही केली नव्हती.
महिला आणि तिची मुलगी दोरीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर आली. मात्र विहिरीतून बाहेर आल्यानंतर दोघेही बेशुद्ध कसे झाले, याचा शोध घेत आहे.