शेतकरी विरोधी कायद्यांची निर्मिती आणि कामगार कायद्यातील बदल, हे शेतकरी व कामगारांना उद्ध्वस्त करणारे असल्याने, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील काम बंद ठेवून २६ नोव्हेंबर रोजी हमाल कष्टकरी रस्त्यावर उतरतील, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढावा यांनी केली. राज्यातील महामंडळाचे पदाधिकाऱ्यांची झूम बैठकीत ते बोलत होते.
बाबा आढाव यांनी सांगितले की, केंद्र सरकार लोकशाहीचे सर्व संकेत गुंडाळून ठेवत असून, त्यामुळे शेतकरी व कष्टकऱ्यांचे जगणे कठीण होणार आहे. कष्टकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या केंद्रीय मंत्री व खासदारांच्या घरावर हमाल कष्टकरी निदर्शने करतील.
यावेळी २६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध कामगार व शेतकरी एकत्र येऊन लढा देण्यास सिद्ध झाले आहेत. प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक संघटनांबरोबर मानवी साखळी धरून हमाल व कष्टकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.