शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्याभोवती आता 11 जवानांचं कडं असेल. संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. ‘वाय’ प्रकारात 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्यांसह 11 जवानांचे सुरक्षा कवच असते. दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचाही (पीएसओ) यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारची सुरक्षा भारतात बऱ्याच व्यक्तींना आहे.
मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला होता. “कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असं जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला. संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाकही वाजवला होता. सोबतच कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत केलेल्या भाषणानंतर त्यांचे पाकिस्तानात पोस्टर लागले होते.