Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यवतमाळ : एकाच गावात 182 जणांना किडनीचा आजार, काय असू शकतात कारणं?

liver patient
, गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (09:54 IST)
नितेश राऊत
“इतकी महागडी औषधं, आपल्यासारख्या शेतकऱ्याला परवडते का?”
 
यवतमाळ जिल्ह्यातल्या आसोला गावचे शेतकरी अर्जुन राठोड असा प्रश्न विचारतात. गेल्या आठ वर्षांपासून त्यांना किडनी विकारानं ग्रासलंय.
 
त्यांचे हातपाय थरथर कापतात, उन्हात गेलं की बधीर झाल्यासारखं वाटतं आणि असह्य वेदना होतात.
 
“शरीरात प्रचंड अशक्तपणा आहे. त्यामुळे कामात मन लागत नाही. जरा दुर्लक्ष झालं की ताप येतो. पोटात जेवणही जात नाही आणि जेवल्याने पोट दुखून येतं. आता महिन्याला 3000 रुपयांची होमिओपॅथी औषध सुरू केले आहे. वर्षाला 50000 रुपये लागतात.” राठोड सांगत होते.
 
अर्जुन राठोड एकटेच नाहीयेत. आसोला गावाच्या बंजारा तांड्यावर तर प्रत्येकच घरात किडनीच्या विकारानं त्रस्त रुग्ण आहेत.
 
1450 लोकसंख्या असणाऱ्या या गावात किडनीच्या आजारामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
पण इथे या आजाराचं प्रमाण एवढं का आहे, याचा तपास अजून लागलेला नाही. तिथली नेमकी स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी आम्ही गावात गेलो होतो.
 
आसोला गाव यवतमाळपासून 30 किलोमीटरवरच आहे. पण इथे जायचं म्हणजे रस्त्यावरच्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो आणि गावत अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव दिसून येतो.
 
अलीकडेच किडनी आजाराने मृत्यू झालेल्या गणेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांना आम्ही भेटलो. घरात शिरताच भिंतीवर हार चढवलेले दोन फोटो होते.
 
त्यावर लिहिलं होतं : गणेश रतन चव्हाण मृत्यू 7/06/23 आणि सुनीता गणेश चव्हाण मृत्यू 10/08/2023.
 
गणेश आणि सुनीता यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांचा मुलगा सोमेश्वरच्या डोळ्यात वयाच्या 20व्या वर्षी आई-वडिलांना गमावल्याचं दुःख दिसत होतं.
 
चव्हाण कुटुंबात आता सोमेश्वर आणि आकाश ही दोन भावंडच उरली आहेत.
 
सोमेश्वर डोळ्यातलं पाणी थोपवत सांगतात, “खूप उपचार केला. नागपूरला नेले मग निशांत चव्हाण या डॉक्टरना दाखवले, सरकारी मध्ये नेले त्यांनतर डॉक्टर भारत राठोड यांच्याकडे नेले. पण उपचार कमी पडले. आई-बाबांना तास फारसा त्रास जाणवत नव्हता. फक्त डोकं दुखतं अस ते म्हणायचे वडिलांचे हात-पाय दुखायचे बाकी काही नाही. मग एकाएकी हा किडनीचा आजार निघाला.”
 
आईवडिलांमागे आता उदरनिर्वाह कसा चालवायचा अशा प्रश्न दोघा भावांसमोर आहे. तसं चव्हाण कुटुंबाकडे चार एकर शेती आहे, पण नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो आहे.
 
“आई- बाबा शेती करायचे. आम्हीपण शेतीच करतो. पण शेतात पाहिजे तेवढं उत्पन्न होत नाही, 10 ते 15 क्विंटलच्या वर आम्ही कधी गेलोच नाही. त्यात दुर्धर आजारावर लागणार खर्च करायचा कुठून? त्यामुळं आम्ही रोज मजुरी करून घर चालवतो,” सोमेश्वर सांगत होते.
 
आम्ही सोमेश्वर यांच्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक नागरिकांनी तिथे गर्दी केली. शेजारीच राहणाऱ्या सुनीता राठोड यांच्याशी आम्ही बोललो.
 
35 वर्षाच्या सुनीता किडनीला सूज आल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून आजारी आहेत. उपचारासाठी त्यांना दर महिन्याला पाच हजार खर्च करावे लागतात.
webdunia
सुनीता आपल्या भाषेत आपली व्यथा मांडतात. “माझं पोट दुखते, उलटी खूप होते, डोकं दुखणं, पोटाचा भयंकर तरास हाये. सोडियम कमी होते. त्याच्यासाठी दवाखाना खूप केला. सावंगी मेघे दवाखान्यात गेलो आता यवतमाळात उपचार सुरू हायेत”.
 
सुनीता यांच्या नवऱ्याचं काही वर्षापूर्वी निधन झालं, तेव्हापासून त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतायत.
 
तीन मुली, सासू-सासरे, दीर आणि सुनीता, अशा सात जणांच्या या कुटुंबाचा गाडा चार एकर शेतीवरच चालतो. मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातला एक भाग औषधांवर खर्च होतो आहे.
 
सुनीता यांनी आतापर्यंत उपचारासाठी ते अडीच लाखांचा खर्च केला आहे. पण आवाक्याबाहेर खर्च करूनही त्यांना आराम पडलेला नाही.
 
आता काम करणेही सुनीता यांच्यासाठी कठीण होऊन बसलंय.
 
त्या सांगतात “गोळ्या सुरू राहिल्या तर बर वाटतं आणि बंद पडल्या की बीमार पडतो. घरातली धुन भांडी करतो मग काही नाही करत. थकवा खूप येते. सगळं खर्च सासरे लावतात”.
 
आरोग्य शिबिरानं उघड केली परिस्थिती
आसोला गावात किडनी विकाराची समस्या किती गंभीर आहे, याची कल्पना 2018 साली आली.
 
त्या वर्षी एका संस्थेमार्फत इथे आरोग्य तपासणीचा कॅम्प भरवण्यात आला, ज्यात मोठ्या संख्येनं किडनी आजाराचे रुग्ण आढळून आले.
 
त्या आरोग्य शिबिरात 72 नागरिकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आणि क्रियेटिन वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
 
त्यानंतर आरोग्य विभागाने पुन्हा रक्त तपासण्या केली, 110 गावकऱ्यांना किडनी विकार असल्याचं दिसून आलं. म्हणजे एका गावातच 182 किडनी आजाराचे रुग्ण सापडले.
 
शासकीय आकडेवारीनुसार असोला गावात आतापर्यंत (सप्टेंबर 2023) किडनीच्या आजाराने 18 लोकांचा मृत्यू झालाय. मात्र हा आकडा प्रत्यक्षात अधिक असण्याची दाट शक्यता आहे.
 
कारण शासकीय आकडेवारीत केवळ ज्यांचं डायलेसिस सुरू आहे किंवा प्रत्यक्षात ज्यांचे पेपर सापडले आहेत, अशा नागरिकांची नोंद घेण्यात आली आहे. ज्यांचे वैद्यकीय कागदपत्र सापडले नाही, अशा किडनी आजाराने झालेल्या मृत्यूंचा विचार केला तर ही संख्या 35 पर्यंत जाते.
 
फक्त आसोलाच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील पांढूर्णा, पिंपरी, वाई, आनंदनगर, हातोला यांसारख्या गावांमध्येही किडनीच्या आजाराचा प्रादुर्भाव आहे.
 
सध्या यवतमाळ मेडिकल कॉलेज मध्ये 55 रुग्ण डायलिसिस घेत आहेत तर महिन्याला चारशे ते पाचशे रुग्ण डायलेसिस घेत आहेत.
 
यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी. चव्हाण सांगतात, “आसोला गावात किडनी आजाराचा प्रश्न पुढे आला तेव्हा आम्ही गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं. ज्यांचं सिरेम क्रियाटिन दोन किवा अडीच पेक्षा जास्त आहे, असे रुग्ण आम्ही शोधून काढले होते”.
 
“त्याचबरोबर जे डायलिसिस वर आहेत, ज्यांना किडनी स्टोन आहे, असे रुग्ण हुडकून त्या भागात कुठल्या कारणाने किडनी आजाराचे रुग्ण याचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र अद्यापही आजाराची नेमकी कारणे सापडलेली नाहीत,” चव्हाण सांगत होते.
 
नेफ्रोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे डॉक्टर्स हा आजार कशामुळे होतो आहे, याचा शोध घेत आहेत.
 
आजाराचे निदान न झाल्यानं अजूनही काही ठोस उपाययोजना प्रशासनाला करता आल्या नाहीत.
 
शिवाय उपचाराचा खर्च परवडत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांची फरफटही थांबताना दिसत नाही.
 
आजारामागचं कारण अस्पष्ट
आरोग्य विभागामार्फत स्थानिक नागरिकांच्या दैनदिन जीवनशैलीवर एक प्रश्नावली तयार करण्यात आली.
 
त्यात संबंधित व्यक्ती कुठल्या आजाराने ग्रस्त आहे, किडनी स्टोन आहे का, कुठली औषधं, पेन किलर्स घेत आहात का, आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी उपचार घेत आहात का, अशा बाबींची नोंद घेण्यात आली. येत्या काही महिन्यात ठोस निष्कर्ष निघतील असं त्यांना वाटतं.
 
आसोला गावातील पाणी पिण्यायोग्य असल्याचं आरोग्य विभागाच्या तपासणीत पुढे आले आहे. पण खबरदारी म्हणून 2018 नंतर गावात RO प्लांट लावण्यात आला. तरीही किडनीच्या आजाराचं आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नाहीये.
 
किडनीविकार तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांचं अमरावती शहरात क्लिनिक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील किडनी आजारावर त्यांनी संशोधन केलं आहे.
 
ते म्हणतात “गेल्या काही वर्षांत यवतमाळ मधून दररोज दहा-दहा रुग्णांचा जत्था बोलेरो गाडी भरून माझ्या हॉस्पिटल मध्ये येत होता. माझ्या मनात कुठतरी शंकेची पाल चुकचुकली.
 
"एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आपल्याकडे का येत आहेत, हा प्रश्न मला पडला. त्यात डायलिसिसवर गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यावेळी मी त्या भागाचं सर्वेक्षण करायला सुरवात केली”
 
असोला गावातील एकाच कुटुंबातील तीन जण डॉ. चौधरी यांच्याकडे डायलिसिस घेत होते. सहा-सहा महिन्यांच्या अंतरानं तिघंही दगावले.
 
डॉ. चौधरी सांगतात, “आम्ही त्या गावात भेट दिली. त्यात आम्हाला धक्कादायक गोष्टी आम्हाला समजल्या. त्या गावातील जेव्हा आम्ही ब्लड सॅम्पलिंग केलं तेव्हा 25 टक्के नागरिक किडनी आजाराचे रुग्ण आम्हांला आढळून आले”.
 
अविनाश चौधरी यांच्यामते यामागे काही कारणं असू शकतात.
 
यवतमाळ जिल्ह्यातलं तापमान. तापमानामुळे शरीराचं निर्जलीकरण होतं यातून किडनीला इजा होते.
मनोरंजनाचं साधन नसणे. त्यामुळे नागरिक दारूच्या माध्यमातून मनोरंजनाचा प्रयत्न करतात, हातभट्टीवरची दारू पितात.
वेदनाशामक औषधं (पेन किलर्स) दारू प्यायला पैसे नसतात आणि मेहनतीच्या कामामुळे अंगदुखी होते. तेव्हा किराणा दुकानातून 1-2 रुपयांत मिळणारी वेदनाशामक औषधं घेऊन खायची. त्यात तीन गोळ्या येतात आणि गावकरी मोठ्या प्रमाणात या गोळ्यांचा आहारी गेले होते.
तांड्यावरच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत. तिथे एक विहीर आणि कूपनलिका यातूनच पाण्याचा पुरवठा व्हायचा. पाण्याच्या स्रोताजवळच धुणी-भांडी व्हायची. शेजारच्या नाल्यात शेतातलं पाणी यायचं आणि तेच पाणी गावकऱ्यांना प्यावं लागत असे.
डॉक्टर अविनाश चौधरी यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले, तेव्हा त्यात TDS आणि क्षार मोठ्या प्रमाणात आढळून आले. पण त्या पाण्यामुळेच किडनीचे आजार होतायत का, या निष्कर्षापर्यंत ते पोहचू शकले नाही.
 
डॉक्टर चौधरी म्हणतात, “कदाचित त्या पाण्यात जंतुनाशकं मोठ्या प्रमाणात मिसळली जात असावीत. किडनीच्या आजारामागचंही हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे आंध्र प्रदेश ते महाराष्ट्र या पट्ट्यात सीकेडी ऑफ अननोन ओरिजन (कारण माहिती नसलेला किडनीचा आजार) याची साथ मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्या भागातही संशोधन करण्याची आवश्यकता आहे.”
 
गेल्या पाच वर्षांत या संशोधनातून कुठलं निश्चित कारण सापडलेलं नाही. आजाराचं स्वरुप आणि तो कुणाला होतो आहे, त्या लोकांच्या जीवनशैलीत काय बदल करायचे याविषयीची केवळ रुपरेषा समजली आहे. पण उष्माघातानं किंवा पेनकिलरमुळे हा आजार होतो आहे की काही जेनेटिक कारणंही आहेत, यावर संशोधनाची गरज असल्याचं ते सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CM शिंदेंकडून सुट्टी जाहीर