लातूर मध्ये क्रेडिटकार्डावर कर्ज घेणाऱ्या एका तरुणाला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्या दबावामुळे त्रासलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुशील दिलीप बोलसुरे असे या मयत तरुणाचे नाव आहे. सुशील हा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सिंदखेड गावातील रहिवासी होता.
तो पुण्यात एका हॉटेल मध्ये वेटर म्हणुन कामाला होता. त्याने एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डावर 1 लाख 27 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र त्याने कर्ज फेडले नाही म्हणुन बँकेचे कर्मचारी त्याच्यावर सतत दबाव टाकायचे.
बँकेतून रोज फोन येत असल्याने सुशील चिंतेत राहिला. सुशीलच्या मित्रांनाही त्याने घेतलेल्या कर्जाची माहिती मिळाली, त्यामुळे त्याच्या मित्रांमध्ये बदनाम झाल्यामुळे तो मानसिक दडपणाखाली होता. दरम्यान सुशील हे गावाकडे सण साजरा करण्यासाठी आले असता तिथे देखील बँकेतून सतत कर्ज फेडण्यासाठी फोन येत असे.सततच्या त्रासाला कंटाळून त्याने 6 जानेवारी रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थल गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगाच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन याची नोंद केली आहे. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.