Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रियांचं ऐतिहासिक कर्तृत्व

स्त्रियांचं ऐतिहासिक कर्तृत्व
प्रजासत्ताक दिन उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना स्वातंत्र्यलढ्याची आणि त्यात सहभाग घेऊन या देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी धडपडणाऱ्यांची आठवण येणं अपरिहार्य आहे. देशाच्या या आंदोलनात पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला होता. गांधीजींच्या प्रेरणेने महिलावर्ग या लढ्यात उतरला हे खरं असलं तरी सुरुवातीला गांधीजी स्त्रियांच्या सहभागाबाबत तितकेसे उत्साही नव्हते. पण स्त्रियांचा उत्साह व कामगिरी पाहून त्यांनी मनापासून दाद दिली होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर स्त्रियांच्या या कामगिरीची म्हणावी तेवढी दखल घेतली गेली नाही. हा विषय अभ्यासकांच्या मनात मात्र जागाच राहिला. बेचाळीसच्या लढ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या वेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांचा एक मेळावा ऑगस्ट क्रांती मैदानात झाला होता हे स्मरते. तिथे स्त्रियांनी सांगितलेल्या आठवणी ग्रंथित करून पुढे त्या पुस्तकरूपात प्रसिद्ध झाल्या होत्या. अशाच त-हेचे एक पुस्तक मुंबई विद्यापीठात झालेल्या एका परिसंवादातूनही जन्माला आलं...
 
मुंबई विद्यापीठात २१ व २२ मार्च १९९८ या काळात ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या अभ्यासकांचे निबंध त्यात सादर झाले. या शोधनिबंधांचं संपादन करून विभाग प्रमुख नवाझ मोदी यांनी एक ग्रंथ सिद्ध केला. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे मराठी पुस्तक प्रकाशित केलं आहे.
 
डॉ. य. दि. फडके यांनी या परिसंवादात केलेल्या बीजभाषणाचा समावेशही यात आहे. स्त्रीसहभागाच्या चार वेगवेगळ्या पाय-या कल्पून तसे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांना ‘राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान,’ ‘महात्मा गांधींच्या चळवळीतील स्त्रियांचा सहभाग,’ ‘अल्पसंख्यांक स्त्रियांचे योगदान’ आणि ‘परदेशी स्त्रियांचे योगदान’ अशा स्वरूपाची शीर्षकं आहेत. त्यावरून त्यातील लेखांची कल्पना येऊ शकते. ‘इतिहासलेखनात स्त्रियांची कामगिरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिली तर बरीचशी विकृत स्वरूपात मांडली जाऊन मर्यादित केली गेली,’ अशी खंत डॉ. य. दि. फडके यांनी व्यक्त केली आहे. 
 
पहिल्या भागात क्रांतिकारी स्त्रियांच्या संदर्भातील लेखांचा समावेश आहे. त्यात येसूबाई सावरकर यांनी थेट चळवळीत सहभाग न घेताही पार पाडलेल्या कामगिरीचं चित्र उत्तरा सहस्रबुद्धे यांनी मांडलं आहे. कल्पना दत्त, अरुणा असफअली, कॅप्टन लक्ष्मी सहगल यांची कामगिरी कौतुकास्पद खरीच पण चाफेकर बंधूंच्या बायकांची कहाणीही त्यांच्या वेदना समोर मांडणारी आहे. चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर या स्त्रियांचे हाल झाले. चार भिंतींआड राहिलेली या स्त्रियांची वेदना चटका लावून जाते. 
 
महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्त्रिया स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरल्या. सूतकताई, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालाची होळी, मिठाचा सत्याग्रह असे लढ्याचे वेगवेगळे मार्ग त्यावेळी हाताळले गेले. त्यात स्त्रिया मोठ्या संख्येने सामील होत्या. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल, अवंतिकाबाई गोखले अशा अनेकजणींबद्दलचे या पुस्तकातले लेख त्यांच्या कामगिरीचा सखोल वेध घेणारे आहेत. ब्रिटिशांशी जिद्दीने लढणा-या आणि वेगवेगळ्या स्तरांवरील क्रांतिकार्यात भाग घेणा-या या सा-या स्त्रियांची कामगिरी मोलाची ती यात शंकाच नाही. तर पेरिन कॅप्टन, तैयबजी कुटुंबातील स्त्रिया, मिठूबेन पेटिट, खिलाफत चळवळीतील महिला, दलित स्त्रिया अशा अल्पसंख्याक गटांमधील स्त्रायंच्या सहभागाचं मूल्यमापन करणारे लेख महत्त्वाची माहिती पुरवतात. 
 
तसेच मीराबेन (मॅडेसिन स्लेड), भगिनी निवेदिता, दक्षिण आफ्रिका व गोवा मुक्ती आँदोलनातील स्त्रिया, अँनी बेझंट अशा मूळच्या परदेशी असलेल्या स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचं मोलही ऐतिहासिक आहे. या सर्वांबद्दलचं पुस्तकातील लेखन या स्त्रियांची उज्जवल कामगिरी अधोरेखित करतं. प्रीता गणेश, रोहिणी गवाणकर, उषा ठक्कर, लीला पटेल, मृदुला देवस्थळी, यास्मिन लुकमानी, अभिनया गायकवाड अशांचे लेख यात आहेत. 
 
संशोधकांना, वाचकांना आणि अभ्यासकांना उपयुक्त असं हे लेखन तरुण पिढीलाही मार्गदर्शक ठरेल. एकविसाव्या शतकातील भारताची उत्तरोत्तर विकासाच्या पथावरून होणारी वाटचाल या सर्व आणि इतर असंख्य अनामिक स्त्रियांच्या विना शक्य झाली नसती, ही जाणीव हे पुस्तक जागी करतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्होडाफोनने नवीन प्रीपेड प्लॅन लॉच