Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साईसच्चरित - अध्याय १६

sai satcharitra chapter 16
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:53 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम; ॥
राजाधिराज चक्रवर्ती । शांतिसिंहासनस्थ मूर्ति । नमूं स्वानंदसाम्राज्यपति । अनन्यगतीं गुरुराज ॥१॥
अभेदभक्ति सहजस्थिति । उभयभागीं चवर्‍या वारिती । स्वानुभूति सद्य:प्रतीति । जया वीजिती अत्यादरें ॥२॥
छत्रधारी स्वात्मस्थिति । वेत्रधारी शांतिसंवित्ति । षडरि मायामोहवृत्ति । जेथें न तगती क्षणभरी ॥३॥
काय या सभेचा थाट । चार सहा अठरा भाटे । चिन्मयचांदवा लखलखाट । पसरला घनदाट स्वानंद ॥४॥
विरक्ति भक्ति शुद्ध ज्ञान । श्रवण मनन निदिध्यासन । निजानुसंधान साक्षात्करण । अष्टप्रधान सेवारत ॥५॥
शान्ति - दान्ति दिव्यमणि । चमकती जयाच्या कंठभूषणीं । वेदान्तसागरसु धातरंगिणी । मधुर वाणी जयाची ॥६॥
झळके जयाची सतेज धार । कराया त्या ज्ञानखङगाचा प्रहार । पाहोनि ज्याचा उद्यत कर । कांपे थरथर भववृक्ष ॥७॥
जय निरंजना अव्यया । गुणातीता योगिराया । परोपकारार्थ धरिलीस काया । उद्धराया दीन जनां ॥८॥
गताध्यायीं निरूपण । भक्तभावार्थ करोनि पूर्ण । पुरवोनि तयानें केलेला पण । पटविली खूण मनाची ॥९॥
सद्नुरु सदा अवाप्तकाम । शिष्य काय पुरवी तत्काम । शिष्यांचाच सेवाकाम । पुरवूनि निष्काम तो करी ॥१०॥
भावें अर्पितां फूल पान । अति प्रेमें करील सेवन । तेंच अर्पितां साभिमान । फिरवील मान जागींच ॥११॥
सच्चित्सुखाचे जे सागर । तयां बाह्योपचारीं काय आदर । परी ते करितां भावार्थें सादर । सौख्य निर्भर सेविती ॥१२॥
नेणतपणाचें पांघरूण । घेऊनि अज्ञान देती ज्ञान । न करितां मर्यादा - अतिक्रमण । गोड शिकवण ते देती ॥१३॥
तयांची सेवा करितां भावें । सेवक ब्रम्हासायुज्य पावे । इतर सर्व साधनीं ठकावें । लीन व्हावें गुरुसेवे ॥१४॥
त्या सेवेची लघु कुचराई । किंवा तेथ लव चतुराई । करितां साधक पडेल अपायां । विश्वास पायीं पाहिजे ॥१५॥
शिष्यें काय कीजे स्वयें । सद्नुरूसीच लावणें सोये । शिष्यास न ठावे निज अपाय । नकळत उपाय गुरु करी ॥१६॥
गुरुपरीस आणीक वदान्य । त्रिभुवनीं पाहतां नाहीं अन्य । शरण्याचा परमशरण्य । शरण अनन्य होऊं त्या ॥१७॥
उपमूं जातां चिंतामणीसीं । चिंतामणी दे चिंतितार्थासी । गुरू देईल अचिंत्य वस्तूसी । परमाश्चर्थेंसीं निजभक्ता ॥१८॥
तुळूं जातां कल्पतरूसी । तों तो पुरवी कल्पितार्थासी । देईल निर्विकल्पस्थितीसी । अकल्पितेसी गुरुराय ॥१९॥
कामधेनु कामिलें पुरवी । गुरुधेनूची तीहून थोरवी । अचिंत्यदानीं ऐसी ही पदवी । कोण मिरवी तिजवीण ॥२०॥
आतां श्रोतयां हेचि विज्ञप्ति । सांगेन म्हणितलें गताध्यायांतीं । ब्रह्मार्थिया ब्रम्हाज्ञानप्राप्ति । कथासंगति अवधारा ॥२१॥
ब्रम्हाज्ञानाचा आलिया भोक्ता । बाबा कैसी करिती तृप्तता । कैसे उपदेशिती निजभक्तां । त्या परमार्था परिसा जी ॥२२॥
संत नित्याचे निष्काम । सकळ परिपूर्ण अवाप्तकाम । परी भक्त अत्यंत सकाम । अतृप्तकाम सर्वदा ॥२३॥
कोणी मागे पुत्रसंतति । कोणी अखंड राज्यसंपत्ति । कोणी मागे भावभक्ति । भवनिर्मुक्ति एकादा ॥२४॥
ऐसाचि एक भक्त भावार्थी । परी निमग्न धनसंचयार्थीं । ऐकूनि बाबांची उदंड कीर्ति । दर्शनार्ति उदेली ॥२५॥
घरीं उदंड संतति संपत्ति । दासदासी अपरिमिति । दर्शन घ्यावें आलें चित्तीं । उदार मूर्ति बाबांची ॥२६॥
बबा मोठे ब्रम्हाज्ञानी । साधुसंतमुकुटमणि । मस्तक ठेवूं त्यांचे चरणीं । अगाध करणी जयांची ॥२७॥
नाहीं आपुल्यास दुजी वाण । आपण मागूं ब्रम्हाज्ञान । सहजीं जाहल्या हें साधन । मग मी धन्य होईन ॥२८॥
मग तया तन्मित्र म्हणे । सोपें नाहीं ब्रम्हा जाणणें । तें तुजसम लोभियाभेणें । प्रकट होणें दुर्घत ॥२९॥
द्रव्यदारासुतांपरती । ठावी न जया सुखोत्पत्ति । तयासी ब्रम्हा ही केवळ भ्रांती । कैंची विश्रांती देईल ॥३०॥
क्षीण होतां इद्रियशक्ति । जगांत कोणी मान न देती । तैं रिकामटेकडे उगाच बैसती । सूत कांतिती ब्रम्हाचें ॥३१॥
तैसी ही तुझी ब्रम्हाजिज्ञासा । चिकट हातींचा न सुटतां पैसा । कोणी न हा तुझा धिंवसा । पुरवील ऐसा मिळेल ॥३२॥
असो ऐसी आस्था मनीं । ब्रम्हार्थी निघाला शिरडीलागोनी । परतभाडयाचा टांगा करोनी । साईचरणीं पातला ॥३३॥
घेतलें साईंचें दर्शन । केलें तयां पायीं नमन । साई मग वदती मधुर वचन । श्रोतां श्रवण तें कीजे ॥३४॥
हा साइ कथाकल्पतरु । अवधानपय:पानें सधरू । जंव जंव वाढे श्रोतयां आदरु । प्रसवेल फलभारू तंव तंव ॥३५॥
रसभावें सर्वांगीं भरेल । सुगंधपुष्पीं तो फुलेल । मधुरफलभारीं तो लवेल । इच्छा पुरेल भोक्त्यांची ॥३६॥
म्हणे तो ‘बाबा ब्रम्हा दाखवा । हेंच आलों धरूनि जीवा । जन म्हणती शिरडीकर बाबा । ब्रम्हा दाविती अविलंबें ॥३७॥
म्हणोनि इतका दूर आलों । मार्ग कंठितां फार श्रमलों । तरी तें ब्रम्हा जरी लाधलों । कृतकृत्य झालों म्हणेन’ ॥३८॥
बाबा वदती “न करीं चिंता । ब्रम्हा दावीन रोकडें आतां । येथें न उधारीची वार्ता । तुजसम पुसताचि दुर्लभ ॥३९॥
मागती बहुत धनसंपदा । निवारा म्हणती रोग आपदा । मागती लौकिक मान राज्यपदा । सौख्य सदा मागती ॥४०॥
केवळ ऐहिक सुखालागुनी । जन शिरडीस येती धांवुनी । लागती मज फकीराचे भजनीं । ब्रम्हा कोणीही न मागती ॥४१॥
तैशियांचा मज सुकाळ । तुजसारिख्यांचाच दुकाळ । ब्रम्हाजिज्ञसूंचा मी भुकाळ । पर्वकाळ हा मजला ॥४२॥
जया ब्रम्हावस्तुभेणें । रविशशींचेम नियत चालणें । नियमें उगवणें नियमें मावळणें । प्रकाश चांदणें नेमस्त ॥४३॥
ग्रीष्म - वसंतादि - ऋतुकाळ । इंद्रादि  देव लोकपाळ । नेमें करिती जो प्रजा - प्रतिपाळ । त्या सर्वां मूळ हें ब्रम्हा ॥४४॥
म्हणून शरीरविस्रंसनाआधीं । सुधी ब्रम्हापुरुशार्थ साधी । त्यावीण पुनरावर्तन निरवधी । लागेल अबाधित पाठीसी ॥४५॥
तें हें ब्रम्हा जाणल्यावीण । होईल जरी शरीरपतन । पिच्छा पुरवील संसारबंधन । पुनर्जनन चुकेना ॥४६॥
ब्रम्हाचि काय मी तुज सगळें । दावितों पहा ब्रम्हागुंडाळें । जें तुज नखशिखांत वेंटाळे । तें मी आगळें उकलितों” ॥४७॥
काय ती सुधामधुर वाणी । केवलाद्वैतसुखाची खाणी । संशयदोलारूढ जे प्राणी । तदुद्धरणीं समर्थ ॥४८॥
आतातरमणीय सुखप्रलोभनीं । गुंतले जे दिवसरजनी । तयांसही बाबांची वचनसरणी । विहिताचरणीं प्रस्थापी ॥४९॥
चिंतामणि प्रसन्न होतां । लौकिकसौख्य चढेल हाता । लाधेल स्वर्गसंपत्तिमत्ता । महेंद्र होतां प्रसन्न ॥५०॥
याहूनि गुरूची अलौकिकता । गुरूसमान नाहीं दाता । दुर्लभ ब्रम्हा दावितील भक्ता । सुप्रसन्नता । पावलिया ॥५१॥
तया गोड कथेच्या श्रवणें । होईल संसारदु:खा विसरणें । ब्रम्हार्थियांसी कैसें शिकविणें । तेंही जाणणें बाबांही ॥५२॥
असो मग त्यातें बैसविलें । क्षणैक अन्य व्यवसायीं त्या गुंतविलें । जणूं त्या प्रश्नाचें भानचि हरपलें । ऐसें दाविलें तयाला ॥५३॥
मग बाबांनीं काय केलें । मुलास एका निकड भारी । हातउसने क्षणभरी । दे झडकरी म्हण त्याला ॥५५॥
मुलगा गेला नंदूचे घरा । कुलूप होतें तयाचे द्वारा । येऊनि तात्काळ माघारा । समाचारा निवेदिलें ॥५६॥
बाबा म्हणती जा परतोनी । असेल घरीं बाळा वाणी । तोच निरोप त्यातें देऊनि । रुपये घेऊनि येईं जा ॥५७॥
व्यर्थ गेली हीही फेरी । बाळाही तेव्हां नव्हता घरीं । मुलगा घडली जे जे परी । सादर करी बाबांसी ॥५८॥
आणखी एका दोघां ठाय़ीं । बाबा धाडिती तया लवलाहीं । थकला हेलपाटियापायीं । कपर्दिक कांहीं लाधेना ॥५९॥
नंदू अथवा बाळा वाणी । एकही ते वेळीं घरीं न कोणी । बाबांस ही जाण पूर्णपणीं । अंतर्ज्ञानी महाराज ॥६०॥
चालतें बोलतें ब्रम्हा साई । पांच रूपयांस अडेल काई । परी त्या ब्रम्हार्थियापायीं । हे नवलाई मांडिली ॥६१॥
पाहुणा येतां घरा । तयाचिया पाहुणचारा । केलें जें मिष्टान्न वा शिरा । भोगही इतरां लाधे तो ॥६२॥
तैसा हा ब्रम्हाभोक्ता । करूनियां पुढारा निमित्ता । महाराज उपदेशिती भक्तां । कल्याणार्था सकळांच्या ॥६३॥
पन्नासाधिक दोनशतें । रुपये नोटांचें पुडकें होतें । त्या ब्राम्हार्थियाचे खिशांत तेथें । तें साईनाथें जाणिलें ॥६४॥
हें काय त्या ब्रम्हार्थिया नकळे । नव्हते काय तयास डोळे । खिशांत असतां नोटांचें भेंडोळें । विकल्पघोळें नाडला ॥६५॥
साईंस पांच रुपडया उधार । आणि त्याही एक घटकाभर । त्याही द्यावया नाहीं धीर । ब्रह्मासाक्षात्कार मागूं ये ॥६६॥
साईमहाराज सत्यवचनी । रकमही लहान हातउसनी । देऊनि पहावें येतांच मनीं । विकल्प येऊनि आदळे ॥६७॥
पांच रुपयांची कथा ती काय । परी ते द्यावया जीव न होय । एवढी जया लाववे न सोय । लोभ स्वयमेव तो जन्मे ॥६८॥
इतर कोणी भाळा भोळा । जयाला बाबांचा खरा जिव्हाळा । उसनवारीचा तो सोहळा । उघडया डोळां बघता ना ॥६९॥
ब्रम्हार्था जो इतुका तान्हेला । त्याला हा प्रश्न नसेल कां उकलला । ऐसें न यत्किंचित्‌ वाटे मजला । परी तो ग्रासिला धनामोहें ॥७०॥
स्वस्थ बैसावें तेंही नाहीं । सुटली परत जाण्याची घाई । तो म्हणे अहो बाबासाई । ब्रम्हा ठायीं पाडा कीं ॥७१॥
बाबा म्हणती “बैसल्या ठायीं । ब्रम्हा दावावें येच उपायीं । केले येथवर उपाय पाहीं । कळले नाहींच कां तुम्हां ? ॥७२॥
ब्रम्हालागीं पंचप्राण । पंचपंचेंद्रियज्ञान । अहंकार बुद्धि मन । लागती समर्पण करावया ॥७३॥
ब्रम्हाज्ञानाचा मार्ग बिकट । सुलभ न सर्वां सरसकट । उदयकाल होतां तें प्रकट । लाभे अवचट सभाग्य ॥७४॥
हिरण्यगर्भपदापर्थंत । सर्वौत्कर्षीं जो विरक्त । तोचि ब्रम्हाविद्येसी अधिकृत । अनासक्त इतरत्र ॥७५॥
अंगीं विरक्ति न लवलेश । ऐशियासी ब्रम्हातत्त्वोपदेश । कोणींही जरी केला अशेष । काय त्या यश येईला ॥७६॥
अबाधित ब्रम्हाबोधन । उत्तमाधिकारिया ग्रहण । परी मध्यमाधिकारी जन । परंपरे - आधीन सर्वदा ॥७७॥
एक अविहंगममार्गसेवन । दुजिया परंपरासोपान । परी या अनधिकारियालागून । वावगा शीण ब्रम्हाचा ॥७८॥
एका आत्मविवेकावांचून । नाहीं निरतिशय प्राप्तिसाधन । हें जरी सत्य वेदान्तवचन । तें काय आधीन सर्वांच्या ॥७९॥
अभ्यास आणि श्रम रोकडे । करूं लागती हाडांचीं कांडें । तईं तें गुरुकृपाउजियेडें । हातीं चढे हळू हळू ॥८०॥
मी एक ईश्वर मी नियंता । हिरण्यगर्भा जैं चढे अहंता । स्वरूपीं पडे विस्मरणता । प्रादुर्भूतता विश्वाची ॥८१॥
‘ब्रम्हाहमस्मीति’ होतां ज्ञान । ज्ञाता होय स्वरूपीं लीन । तैंच विश्वाभासविसर्जन । श्रुति गर्जन करिते कीं ॥८२॥
होतां स्वप्रबोधोत्पत्ति । ब्रम्हाकारांत:करणवृत्ति । ब्रम्हाग्नींत विश्वाची आहुती । होते विभूति सृष्टीची ॥८३॥
जीवांचीही हेच स्थिति । होते जेव्हां भ्रमनिवृत्ति । रज्जू किरण आणि शुक्ति । आभास मुकती तत्काळ ॥८४॥
शुक्यज्ञान तेंच रतनभान । रजतज्ञान तेंचि शुक्तिज्ञान । भ्रमनिवृत्तिकालीं रौप्यावसान । शुक्तिकाविज्ञान निर्भेळ ॥८५॥
अन्योन्य - मोहाचं हे लक्षण । ज्ञानदीपाचें करा उजळण । अज्ञानमला करा क्षालन । निर्दाळण तैं प्रतिभासा ॥८६॥
जन्म - मृत्यूंचा नसता बंध । असता किमर्थ मोक्षनिर्बंध । वेदान्ता आम्हां काय संबंध । मग हा प्रबंध कायसा ॥८७॥
आहें मी बद्ध व्हावें निर्मुक्त । ऐसा जो द्दढनिश्चयासक्त । तोच येथील अधिकारी फक्त । न युक्त अत्यज्ञ वा तज्ज्ञ ॥८८॥
बद्धचि नाहीं कैंची मुक्ति । हे तों आहे वस्तुस्थिति । बद्धमुक्तता गुणसंगातीं । आहे प्रतीति अवघियां ॥८९॥
द्वितीयाचा अभाव जेथें । बांधी सोडी कवण कवणातें । कोणीही न बद्ध वा मुक्त तेथें । द्वैत - अद्वैतें गेलिया ॥९०॥
दिन रजनी हे प्रकार । उत्पादी काय दिनकर । हा तों द्दघ्दोषव्यवहार । दिवाकर अलिप्त ॥९१॥
मी एक कर्ता मी एक भोक्ता । हा अभिमान धरूनि चित्ता । स्वर्गनरक सुखासुख अनुभवितां । वासनासक्तता वाढते ॥९२॥
आत्मा नित्य पुराण शाश्वत । जन्मनाशादि - विकारवर्जित । ॐ काराक्षरप्रतीकवंत । अनाद्यनंत संतत जो ॥९३॥
जयाची शरीरमात्रात्मद्दष्टी । स्वयें निराळा निराळी सृष्टी । तयास आत्मज्ञानाची कष्टीं । परामृष्टि लाधेना ॥९४॥
वाण्यादि - सर्वेंद्रियांचा लय । करा मनीं व्हा कृतनिश्चय । त्या मनाचा करा क्षय । घ्यावा ठाय बुद्धीचा ॥९५॥
प्रकाशस्वरूप जे ज्ञानबुद्धि । मनासी तेथें लावा समाधि । मनासह सर्वेंद्रियसमृद्धि । एका स्वाधीन बुद्धीच्या ॥९६॥
घटासी आद्यकारण माती । इंद्रियां बुद्धि तैशाच रीती । ते तयांची नित्य स्थिति । ऐसी हे व्याप्ति बुद्धीची ॥९७॥
बुद्धि निजव्यापकपणें । व्यापी मनादि सकल करणें । बुद्धीस महत्तत्त्वीं निरविणें । महत्‌ समर्पणें अत्मत्वीं ॥९८॥
ऐसाच करितां समाहार । होय आत्मस्वरूपनिर्धार । मग रजत - मृगजल - सर्पाकार । द्दग्विकार केवळ ते ॥९९॥
तो हा अशेष - विशेषरहित । जन्मापक्षयविवर्जित । यद्दर्शनेंवीण नाहीं स्वहित । साधु सतत बोलती ॥१००॥
कार्यमात्रा आहे कारण । आत्मा स्वयंभू निषकारण । ‘पुराऽपि नव’ हा पुराण । बुद्धिहीन स्वभावें ॥१०१॥
आकाशवत्‌ अविच्छिन्न । जन्मविनाश - विलक्षण । ‘ॐ प्रणव’ जयाचें आलंबन । निरलंबन निष्कल जो ॥१०२॥
परब्रम्हा तें ज्ञातव्य । अपर ब्रम्हा तें प्राप्तव्य । ॐ तत्प्रतीक ध्यातव्य । उपासितव्य सर्वदा ॥१०३॥
सर्व वेदांचें जें सार । प्रणवस्वरूप तोच ॐ कार । तयाचा सार्थ जो निर्धार । तोच विचार महावाक्याचा ॥१०४॥
वेद स्वयें जे प्रतिपादिती । जें अतिप्रयत्नें जन संपादिती । यदर्थ ब्रम्हाचर्य आचरिती । ॐ पद म्हणती तयासी ॥१०५॥
असो तया पदाचा आक्रम । करूं जातां जरी दुर्गम । तरी तें अभ्यासियां सुगम । होतां परम गुरुकृपा ॥१०६॥
इंद्रियांमाजील जीं स्थूल परम । तेथूनि धरितां अनुकम । आदरितां सूक्ष्म तारतम्यक्रम । साधे अविश्रम साधका ॥१०७॥
तें हें ॐ शब्दवाच्य अक्षर । सकळ तपाचें जें सार । उच्चारमात्रें स्फुरे अर्थसार । साक्षात्कार आवर्तनें ॥१०८॥
अविपरिलुप्त चैतन्य । वृद्धिक्षयविकारशून्य । ऐसा आत्मा जाणील तो धन्य । भक्त अनन्य सद्नुरूचा ॥१०९॥
अध्यात्म - अधिभूत -अधिदैव । त्रिविध तापीं तापलें जे सदैव । ते कैंचे भोगितो हें सुदैव । वैभव हें एक संतांचें ॥११०॥
अविद्येपोटीं उपजे संसृति । त्यापासोन व्हावया निवृत्ति । साधन जें ब्रम्हात्मैकत्ववृत्ति । तयाची प्राप्ति ये ठायीं ॥१११॥
विषयकल्पनाशून्य स्थिति । ‘अहं ब्रम्हास्मीति’ वृत्ति ।या महावाक्याचिया आवृत्ति । बुद्धिप्रवृत्ति होईल जैं ॥११२॥
गुरुवचनशास्त्रप्रतीति । अंतर्बाह्य करणवृत्ति । मनासह उपरमा पावती । आत्मसंवित्ति लाभे तैं ॥११३॥
तैंच सम्यग्दर्शनप्राप्ति । विशयार्थादि जड निवृत्ति । तुटे अविद्यादि ह्रदयग्रंथि । होय अव्यक्तीं प्रविष्ट ॥११४॥
कवडशांतील अतिसूक्ष्म कण । तयाहूनही सूक्ष्म प्रमाण । तया अणूहूनही अणीयान । आत्मानुमान - निर्धार ॥११५॥
मोठयांत मोठें ब्रम्हांड जाण । त्याहूनही आत्मा महिमान । परी हे सर्व सापेक्ष प्रमाण । आत्मा प्रमाणातीत तो ॥११६॥
सूक्ष्मत्वें ‘अणोरणीयान’ । महत्त्वें महत्परिमाणवान । एवं नामरूपादि केवळ उपाधी जाण । आत्मा परिपूर्ण निरुपाधिक ॥११७॥
आत्म्यास ना जन्म ना मरण । नाहीं तयासी मूलकारण । अज - नित्य - शाश्वत - पुराण । सहज निर्धारण दुर्गम ॥११८॥
‘ॐ कार’ प्रतीक जें ब्रम्हा । तेंच त्याचें स्वरूप परम । आगमनिगमांसही दुर्गम । तें काय सुगम सर्वत्रां ॥११९॥
जया निर्धारितां वेद थकले । तपस्वी वनवासी झाले । उपनिषदीं हात टेंकिले । कोणा न झालें निदान ॥१२०॥
पावावया आत्मस्वरूपाचिया ठावा । अभेददर्शी आचार्यचि व्हावा । तदितरांचा कोण केवा । रिघावा न तेथें तार्किका ॥१२१॥
केवळ तार्किका न तेथें थारा । भ्रमावर्तीं फिरेल गरगरां । आगम - आचार्यावीण इतरां । स्थिरावेना तत्त्वबुद्धी ॥१२२॥
स्वबुद्धिकल्पनेचे अनंत तारे । न चुकविती लखचौर्‍यांशीं फेरे । आगम - आचार्येंदु एकचि पुरे । मग तम नुरे लवलेश ॥१२३॥
इतरां न सधे जें बहु सायासें । तेंच साधील तो अल्पायासें । जो द्दढ धरी त्या सद्नुरूचे कासे । तया प्रकाशे सद्विद्या ॥१२४॥
सकार्य अविद्या जेथ सरे । सच्चिदानंदस्वरूप स्थिरे । स्वस्वरूप - स्थिति अवतरे । मोक्ष दुसरें नाम त्या ॥१२५॥
हेंच जीवाचें अत्यंत अभीष्ट । यदर्थ करिती बहुत कष्ट । जें निरंतर ब्रम्हायोगनिष्ठ । अंतर्निष्ठ सर्वदा ॥१२६॥
स्वरूपीं होतां चंचळ । उठे विषयांई खळबळ । झालिया स्वरूपीं निश्चळ । येई विकळता विषयांतें ॥१२७॥
स्वरूपीं जो विमुख । विषय तया सदा सन्मुख । तोच होतां स्वरूपोन्मुख । विषय मुख फिरविती ॥१२८॥
मोक्षमात्राचीच इच्छा करी । अन्यार्थीं निरिच्छ अभ्यंतरीं । इहपरत्रार्थ तृष्णालेश न धरी । तोच अधिकारी मोक्षाचा ॥१२९॥
यांतील जो एका लक्षणें उणा । मुकुक्षू नव्हे तो स्पष्ट जाणा । तो केवळ मुकुक्षूचा बहाणा । जैसा काणा देखणा ॥१३०॥
अहंकार गळाल्यावीण । न होतां लोभाचें निर्मूलन । न होतां मन निर्वासन । ब्रम्हाज्ञान ठसेना ॥१३१॥
देहात्मबुद्धि हेच भ्रांति । बंधासी कारण आसक्ति । सोडा विषयकल्पना - स्फूर्ति । ब्रम्हाप्राप्ति हातीं ये ॥१३२॥
निर्विशेष परब्रम्हा । साक्षात्कार ये कठिण कर्म । सविशेष निरूपण हेंचि वर्म । हाचि धर्म धीमंदां ॥१३३॥
आत्मा गूढ सर्वांभूतीं । हें तत्त्व जाणती वेदांती । तरी यावी सर्वत्र अनुभूती । ऐसी प्रतीति कैसेनी ॥१३४॥
आधीं लागे चित्तशुद्धि । वरी सूक्ष्म कुशाग्रबुद्धि । तेव्हांच प्रकटे हा त्रिशुद्धि । कृपासमृद्धि स्वयमेव ॥१३५॥
आत्मा नित्य अविकृत । आत्मविद तो शोकरहित । तोच धैर्यवंत धीमंत । भवनिर्मुक्त तो सदा ॥१३६॥
येथ न चले प्रवचनयुक्ति । किंवा ग्रंथार्थधारणाशक्ति । अथवा वेदश्रुति - व्युत्पत्ती । कांहीं उपपत्ति लागेना ॥१३७॥
आत्मा नित्य अविकृत । शरीर अनित्य अनवस्थित । हें जाणोनि साधे जो स्वहित । विहिताविहित - दक्ष तो ॥१३८॥
आत्मज्ञानी सदा निर्भय । एकींएक अद्वितीय । दुजेपणाचा पुसिला ठाय । शोकात्यय द्दढ फळे ॥१३९॥
आत्मा जरी दुर्विज्ञेय । नातुडे प्रवचनश्रवणें ठाय । केवळ मेधा करील काय । तरीही सुविज्ञेय उपायें ॥१४०॥
जो स्वयें सर्वत्र निष्काम ॥ आत्मज्ञानैकमात्रकाम । ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम । तयासचि परम लाभ हा ॥१४१॥
श्रवणादिकाळीं ‘तोच मी आहें’ । ऐसिया अभेदद्दष्टीं जो पाहे । हेंच अनुसंधान जयाचें राहे । आत्मा अनुग्रहें वरी त्या ॥१४२॥
सदा दुश्चरितासक्त । अशान्त आणि असमाहित । नाहीं जयाचें एकाग्र चित्त । तया हा अप्राप्त ज्ञानिया ॥१४३॥
श्रुतिस्मृति - प्रतिपादित । करी जो विहित, त्यागी अविहित । जयाचें नित्य समाहित चित्त । आत्मा अंकित तयाचा ॥१४४॥
दुश्चरितापासाव जो विरत । आचार्यगुरुपदीं जो विनत । फलाची इच्छा जयाची निवृत्त । तयासीच प्राप्त हा आत्मा ॥१४५॥
न होतां विषयां निष्काम । न होतां केवळ आत्मकाम । न होतां सकळवृत्तिविराम । आत्माराम दुर्गम ॥१४६॥
पाहूनि जिज्ञासुच्या तपा । स्वयें आत्म्यास उपजेल कृपा । तैंच प्रकटी निजस्वरूपा । गुरुवीण सोपा नव्हेच ॥१४७॥
तरी स्वरू पप्राप्त्यर्थ साधकें । करावीं श्रवणमननादिकें । अभेदभावानुसंधान निकें । तरीच सुखें आत्मलाभ ॥१४८॥
प्रपंच हा अज्ञानमय सारा । अज्ञानमूलक तयाचा पसारा । ज्ञानावीण मोक्षास थारा । नाहीं जरा हें समजा ॥१४९॥
अनुमान आणि युक्तिप्रभव । हा तो शास्त्राचा अनुभव । प्रपंचनाशींच ज्ञानोद्भव । असंभव अन्यथा ॥१५०॥
महात्मा हो कां पापात्मा । जीवात्मा तोच परमात्मा । हें जाणूनि वर्तेल तो महात्मा । अभेदात्मा तो एक ॥१५१॥
ब्रम्हात्मैकत्व विज्ञान । हेंच ज्ञानाचें पर्यवसान । झालिया एकदां आत्मज्ञान । समस्त अज्ञान मावळे ॥१५२॥
आत्मज्ञान होतां पुरें । अवगंतव्य मग कांहीं नुरे । करतलगत वस्तुजात सारें । साक्षात्कारें तयासी ॥१५३॥
आत्मविज्ञानाचें फळ । संसारनिवृत्ति अविकळ । परमानंदप्राप्ति तात्काळ । तया सुकाळ मोक्षाचा ॥१५४॥
आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर । महताहूनि महत्तर । हा तों सर्वव्यापकताप्रकार । बुद्धिगोचर करावया ॥१५५॥
तो स्वयें सूक्ष्म ना महत्‌ । तरतमभाव तेथें कल्पित । तो तों आब्रम्हास्तंबपर्यंत । परिपूरित चराचरीं ॥१५६॥
तें हें अनिर्वचनीय सत्‌ । बुद्धींत व्हावया संकलित । वाचेनें करिती मर्यादित । अमर्यादित जें स्वयें ॥१५७॥
केवळ बुद्धिवैभवाचे योगें । खरें वर्म हातीं न लागे । साधु सद्नुरु संतसंगें । सेवानुरागें तत्प्राप्ती ॥१५८॥
ब्रम्हानिरूपण काय थोडें । पोथ्या पुस्तकीं भरलें रोकडें । परी सद्नुरुकृपा जों न घडे । हातीं न चढे कल्पांतीं ॥१५९॥
नित्य नैमित्तिक कर्माभावीं । शुद्धसंस्कारयुक्त जों मन नाहीं । तोंवरी ब्रम्हानुभव पाहीं । मुळींच कांहीं नागवे ॥१६०॥
ब्रम्हा केवळ नित्य । तद्वयतिरिक्त सर्व अनित्य । द्दश्यजाता नाहीं सातत्य । सत्य त्रिवाचा ॥१६१॥
ब्रम्हाचा वक्ताही दुर्मिळ । तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ । वरी प्रेमळ आणि अनुभवशील । सद्नुरु विरळ लाधाया ॥१६२॥
ब्रम्हा काय वाटेवर पडलें । गिरिकंदरीं जे जे दडले । यमनियमीं जे अडकले । गढले ध्यानधारणीं ॥१६३॥
त्यांनाही न होतां गुरुकृपा । येईना जें ब्रम्हा रूपा । तें तुजसम या लोभस्वरूपा । आतळे बापा कैसेनि ॥१६४॥
जयास उदंड द्रव्यासक्ति । तयास ब्रम्हाज्ञानप्राप्ती । न घडे कधींही कल्पांतीं । गांठ निश्चिती बांधावी ॥१६५॥
करितां परमार्थश्रवण । करी विषयांचें चिंतन । आणि प्रपंचाचें निदिध्यासन । मग साक्षात्करणही तैसेंच ॥१६६॥
मल-विक्षेप आणि आवरण । ऐसें त्रिदोषी अंत:करण । निष्काम कर्में मल-निर्मूलन । विक्षेप - क्षालन उपासना ॥१६७॥
स्वकर्म आणि उपासना करितां । परिपव्कता येते कर्त्याचे चित्ता । मल - विक्षेप निर्मूळ होतां । आवरण - शेषता राहते ॥१६८॥
तें हें सर्वानर्थबीज आवरण । नासूनि जातें प्रकटतां ज्ञान । होतां रवि प्रकाशमान । जेवीं निरसन तिमिराचें ॥१६९॥
सत्यज्ञानानंतादि लक्षणीं । वर्णिलें जे वेदांतविचक्षणीं । तें ब्रम्हा ज्याचा तोच जनीं । होतां ज्ञानी विलसतें ॥१७०॥
थोडा अंधार थोडें चांदणें । एकला पांथस्थ रानीं चालणें । बिचकला स्थाणू तस्करभेणें । लपला तेणें तेथेंच ॥१७१॥
एकला मी जवळी पैसा । तो त्र टपला वाटपाडया जैसा । आतां करावा विचार कैसा । न ये भरंबसा जीवाचा ॥१७२॥
तोंच दुरूनि दीप येतां । प्रकटतां स्थाणूची यथात्मता । विरली तयाची भीतिग्रस्तता । कळली ती आभासता चोराची ॥१७३॥”
असो आतां या प्राप्तासी । निवेदिले व्यत्यय श्रोतयांसी । पुढील अध्यायीं श्रेयार्थियासी । श्रेय प्रकाशील निजरूप ॥१७४॥
हेमाड साईपदीं लोळे । वाचेस येईल तैसें बरळे । साईकृपा जें जें चावळे । परिसोत भोळे भाविक तें ॥१७५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ब्रम्हाज्ञानकथनं नाम षोडशोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ALSO READ: साईसच्चरित - अध्याय १७

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साईसच्चरित - अध्याय १५