Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साईसच्चरित - अध्याय ४१

sai satcharitra chapter 41
, शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:01 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
हेंच सईकथेचें महिमान । कितीही परिसा नलगे प्रोत्साहन । श्रोतेच राखूनि पूर्वानुसंधान । अति सावधान श्रवणार्थीं ॥१॥
करावया कथापान । जेथें श्रोतेच सावधान । किमर्थ मग प्रार्थवें अवधान । वृत्ति जैं एकतान आधींच ॥२॥
गातां परिसतां निजगुरुमहती । होईल निर्मळ चित्तवृत्ती । द्दढा ध्यान नामानुवृत्ती । सुखैकमूर्ती प्रकटेल ॥३॥
गताध्यायीं जाहलें कथन । कैसें एका व्रताचें उद्यापन । तथासांग जाहलें पूर्ण । द्दष्टान्तखूणसमवेत ॥४॥
तैसीच साईंची पार्थिव छबी । कवण्यापरी आकस्मित यावी । कैसी वेळेवर इच्छा पुरवावी । कथा परिसावी ही आतां ॥५॥
एका होळीचिया सणा । येतों मी आज घालीं भोजना । साई ऐसिया देऊनि स्वप्ना । होय मनकामना पुरविता ॥६॥
कथा ही पूर्वींच कथिली सविस्तर । परी ती प्रतिमा कैसी वेळेवर । यावी हा कैसा काय चमत्कार । तें आज सादर परिसावें ॥७॥
कथा सांगे अल्ली महंमद । वाटली परम आश्चर्यप्रद । ही तरी एक लीलाच विशद । अति विनोदकारक ॥८॥
यांनींच ती होळीच्या दिवसीं । आम्ही दुपारा जेवावयासी । बैसावयाचे ऐन समयासी । आणूनि उल्लासित केलें मज ॥९॥
हें तों पूर्वील कथानुसंधान । आतां श्रोतां सावधान । परिसिजे पुढील निरूपण । चरित्र पावन साईंचें ॥१०॥
ती ही कथा सरस पूर्ण । श्रोते आधींच दत्तावधान । वक्ता साईपदीं लीन । चरित्र गहन साईंचें ॥११॥
परोपकाराची ती प्रतिमा । परोपकारार्थ झिजवी आत्मा । सदा सर्वदा निर्वैरधर्मा । अखंड सत्कर्मा वाहिला ॥१२॥
बरी वाईट कैसीही स्थिति । देहकर्में देहा न सुटती । परी ती लावा अंतर्वृत्ति । गुरुचरणीं प्रीतिपूर्वक ॥१३॥
मग निजभक्ताचा योगक्षेम । गुरु कैसा चालवी अविश्रम । तें गुरुचरणीं ठेवूनि प्रेम । पहा अत्युत्तम अनुभवें ॥१४॥
हे स्थिति मागितल्या न मिळे । ठायीं पडे गुरुकीर्तनमेळें । जें न महत्प्रयत्नेंही आतळे । तें गुरुकृपाबळें चालत ये ॥१५॥
धरोनियां दुरभिमान । करूं आले जे सूक्ष्मनिरीक्षण  । तेही सर्व परतले त्यक्ताभिमान । स्खायमान दर्शनसुखें ॥१६॥
यश - श्री - औदार्य - ज्ञान । शांति - वैराग्य हे षड्‌गुण । इंहीं श्रीसाई भगवंत पूर्ण । ऐश्वर्यें संपूर्ण हरि जैसा ॥१७॥
किती हो आमुचें भाग्य गहन । जेणें हा साई चैतन्यघन । विना अर्चन - पूजन - भजन । देई दर्शन आम्हांतें ॥१८॥
म्हणती भक्तीपाशीं देव । आम्हांपाशीं भक्तीचा अभाव । परी हा साई महानुभाव । कनवाळू स्वभाव दीनार्थ ॥१९॥
असो तो अल्लीच वदे जी आतां । श्रोतां साद्यंत ऐकिजे वार्ता । कळेल साईलीला - गहनता । आणीक निजसत्ता तयाची ॥२०॥
एके दिवशीं मुंबानगरीं । फिरत असतां रस्त्यावरी । चित्रें मनोहर आणि तसबिरी । विकणारा व्यापारी अवलोकिला ॥२१॥
चित्रें सुंदर नानापरींचीं । संता - महंता - अवलियांची । पाहोनि जाहली वृत्ति मनाची । कवणा कवणाचीं तीं पाहूं ॥२२॥
म्हणोनि एकेक पाहूं लागतां । आवडली ही तसबीर चित्ता । सर्वांहूनि तिची मोहकता । शिवाय ती आराध्य देवताही ॥२३॥
आधींच मनीं साईंची आवड । सन्मुख तयांची मूर्तीही उघड । पाहूनिग्यावया जहाली तांतड । किंमत मी रोकड मोजिली ॥२४॥
मग ती तसबीर आणिली घरीं । टांगूनि ठेविली  भिंतीवरी । आनंदें नित्य दर्शन करीं । प्रेमही मज भारी बाबांचें ॥२५॥
दिधली मीं ही तुम्हांपाशीं । तया आधीं तिसरे मासीं । आराम नव्हता माझिये जीवासी । राहिलों सहवासीं मेहुण्याच्या ॥२६॥
नूरमहमद पीरभॉय । मेहुणा हा मजला होय । सुजला होता माझा पाय । केला मज उपाय शस्त्रक्रियेचा ॥२७॥
ऐसा असतां दुखणाईत । तीन महिने राहिलों तेथ । कोणीच नव्हतें माझिये घरांत । या तीन महिन्यांत वस्तीस ॥२८॥
प्रसिद्ध बाबा अबदुल रहिमान । मौलाना साब महमद हुसेन । बाबासाई बाबा ताजुद्दिन । इंहीं न तें स्थान त्यागिलें ॥२९॥
हे सर्व आणि ऐसे च इतर । यांचीं छायाचित्रें भिंतीवर । होतीं माझिये घरांत मनोहर । सोडी न हें कालचक्र तयांही ॥३०॥
माझी इकडे ऐसी गती । चित्रांमागें कां साडेसाती । वाटे वस्तूसी होतां उत्पत्ती । प्रलयस्थितीही दुर्लंघ्य ॥३१॥
असो ऐसी असतां परिस्थिती । साईच कैसे त्यांतूनि चुकती । हें तों हा काळवरीही मजप्रती । कोणीही न सकती सांगावया ॥३२॥
येविषयींची समूळ कथा । विस्मय वाटेल तुम्हां परिसतां । कळेल साईंची स्थिरचरात्मकता । अतर्क्य विंदानता तयांची ॥३३॥
संतबाबा अबदुल रहिमान । यांचें एक चित्र लहान । महमदहुसेन थारियाटोपण  । यांचे स्वाधीन होतें कीं ॥३४॥
तेणें तयाची मज एक प्रत । दिधल्या जाहलीं वर्षें बहुत । ती मी माझे मेहुण्यास देत । कीं ते अंकित तयांचे ॥३५॥
तीही आठ वर्षेंपर्यंत । होती तयाचे मेजाचे खणांत । सहज एकदां आढळतां अवचित । नेली ती दुकानांत मुंबईस ॥३६॥
जितुके बाबा अबदुल मोठे । चित्रही करविलें तेवढें गोमटें । कीं तें न्यावें तयांचिया भेटे । प्रेमही दाटेल तदंतरीं ॥३७॥
तयावरूनि घेतल्या नकला । आप्तेष्टमित्रां दिधल्या सकळां । त्यांतीलचि एक दिधली मजला । होती मीं भिंतीला लाविलेली ॥३८॥
मग ती परम सुंदर तसबीर । भरतां अबदुल रहिमान दरबार । नूरमहमद जाहला तत्पर । करावया सादर त्या संता ॥३९॥
पाहूनि हें तयाचें मन । चित्र पाहतांच अबदुल रहिमान । जाहले अत्यंत कोपायमान । उठले त्या ताडण करावया ॥४०॥
करूनियां निर्भर्त्सन । दिधलें तयास घालवून । तेणें तो अत्यंत खिन्नवदन । चिंता गहन उद्भवली ॥४२॥
होतों आज गुरुकृपासंपन्न । तोच मी झालों रोषास कारण । ऐसें वदूनि साशंक होऊन । चित्रविसर्जन आरंभी ॥४३॥
म्हणे आतां या संतप्रतिमा । कधींही न घरीं ठेवितां कामा । तेणेंच अंतरलों निजगुरुपेमा । किमर्थ रिकामा ह धंदा ॥४४॥
म्हणे जया चित्राच्या पायीं । गुरु माझा मज नाराज होई । पाडील कधीं तरी तें अपायीं । तें मज नाहीं कामाचें ॥४५॥
हें तरी एक प्रतिमापूजन । नावडे मम गुरूलागून । तरी मग या नाराज ठेवून । चित्राचें प्रयोजन काय मज ॥४६॥
जाहला बहु द्रव्यव्यय । करावया या चित्रांचा संचय । तरी त्या आतां न दुजा उपाय । शिवाय तोयविर्जना ॥४७॥
म्हणोनि मग माझा मेहुणा । सवें घेऊनि ती छबी जाणा । न देतांही मागतिया कवणा । पातले विसर्जना धक्क्यावर ॥४८॥
गेले अपोलो बंदरीं थेट । ठरविली एक भाडयानें बोट । जाववेल तों जाऊनि थेट । समुद्रीं ती शेवट विसर्जिली ॥४९॥
असो ते येथेंच नाहीं थांबले । वांद्रें येथेंही तेंच आरंभिलें । सर्वां आप्तेष्टमित्रां विनविलें । फोटो घेतले मागून ॥५०॥
म्हणाले बाबा अबदुल कोपले । फोटो ज्यांणीं त्यांणीं आपले । परत द्यावे पाहिजे विसर्जिले । सकळां विनविलें एणेपरी ॥५१॥
मजकडूनही दिधलेली प्रत । घेतली माझे भावाचीही परत । बहिणीचीही केली हस्तगत । मिळविल्या समस्त सहा प्रती ॥५२॥
मग तो घेऊनि सहाही प्रती । वांद्रें शहरीं समुद्रावरती । थेट जेथें जमीन सरती । पातला ते प्रांतीं सरोष ॥५३॥
पाचारूनि एक कोळी । मग तीं अवघीं चित्रें ते काळीं । करूनियां तयाचे हवालीं । निक्षेपियेलीं अब्धिजलीं ॥५४॥
मीही तेव्हां व्यथाग्रस्त । होतों तयाचिया घरांत । मलाही तो ऐसेंच उपदेशीत । संकटें आणीत या प्रती ॥५५॥
तरी त्या अवघ्या गोळा करून । करिसील जेव्हां समुद्रीं विसर्जन । तेव्हांच तुझिया व्यथेचें निरसन । होईल जाण निर्धारें ॥५६॥
मीही माझा पाचारिला मेथा । किल्ली देऊन त्याचिये हाता । आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता । सोंपिली व्यवस्था मेहुण्यातें ॥५७॥
त्यानें आपुला बोलाविला माळी । तयाकरवीं त्या तात्काळीं । चिंबाईच्या देवळाजवळी । समुद्रजळीं निक्षेपविल्या ॥५८॥
पुढें जातां दोन मास । होतां आराम मम जीवास । जातां मी आपुलिया बिर्‍हाडास । अति आश्चर्यास पावलों ॥५९॥
तुम्हांस म्यां जी दिली तसबीर । ती द्वारासमोरचि भिंतीवर । पाहोनियां पूर्ववत स्थिर । वाटला मज थोर विस्मय ॥६०॥
अवघीं चित्रें मेथानें आणिलीं । हीच तसबीर कैसी कीं चुकली । म्हणोनि मीं ती तात्काळ काढिली । छपवूनि ठेविली कपाटीं ॥६१॥
पडतांच मेहुण्याची द्दष्टि । घेईल तो ती उठाउठीं । नेईल जलसमाधीसाठीं । ऐसें मज पोटीं वाटलें ॥६२॥
ठेवों न लाहे निजगृहातें । मेहुणा पाहताम्चि बुडवीत हातें । देवों न लाहे आणिकातें । नि:शंकचित्ते अभक्ता ॥६३॥
विना विचारें देईन कवणा । तरी न झालिया योग्य जोपासना । राहील अस्वस्थता सदैव मना । ही दीर्घ विवंचना सर्वदा ॥६४॥
तरी ती जेथें राहील सुरक्षित । पाहावें ऐसें स्थळ त्या उचित । ठेवील आपुले घरीं जो व्यवस्थित । तयाच्या हस्तगत करावी ॥६५॥
ऐसें मन पडतां अडकित्तां । साईच सुविचार सुचवी चित्ता ।  जावें मौलाना दरबारीं आतां । इसमूस वृत्तांत कथावें ॥६६॥
मग मी तेव्हां तैसाचि सत्वरी । गेलीं पीर मौलाना दरबारीं । मुजावर इस्मूस ही वार्ता सारी । कळविली अत्यादरीं एकांतीं ॥६७॥
आम्हां उभयतांचा निर्णय । आपुलेपाशीं राहील ही निर्भय । म्हणोनि ते दिनींच आम्ही उभय । केला कीं निश्चय मनाचा ॥६८॥
कीं ही समर्थ साईंची छबी । आपुले येथेंच ठेविली जावी । स्वयें आपणा समर्पावी । तेणेंच ती ठायीं पडेल ॥६९॥
तंव त्या कृतनिश्चयानुसार । केली ती प्रतिमा आपणं सादर । पाहूनि आपुलें जेवण तयार । तैसाच मी सत्वर परतलों ॥७०॥
ही लांब कथा परिसावयास । नव्हता आपणां तेव्हां अवकाश । पुढें मागें कथूं ती सावकाश । धरूनि हा उद्देश गेलें मी ॥७१॥
आज उद्यां करितां करितां । सबंध नऊ वर्षें भरतां । आज ही झाली भेट अवचिता । आपणां उभयतां परस्पर ॥७२॥
तेणें ही आठवली । पूर्वपीठिका । आपणही कथिलें स्वप्नकौतुका । संबंध जुळला अपूर्व कथानका । नाहीं अद्भुत कां ही लीला ॥७३॥
अतां एक द्जी कथा । सावध चित्तें परिसिजे श्रोतां । साई कैसे प्रेमळ भक्तां । अति सप्रेमता वागवीत ॥७४॥
जयां परमार्थीं खरी गोडी । तयांची साईस मोठी आवडी । वारूनि सर्व तयांचीं सांकडीं । स्वानंदजोडी दे तयां ॥७५॥
ये अर्थींचा अनुभव गोडा । बाळासाहेब देवांची होड । पुरविली पुरवूनि तयांचीं कोड । दिधली त्यां जोड भक्तीची ॥७६॥
दिवसा नोकरी केल्याशिवाय । योगक्षेमा नव्हता उपाय । परी रात्रौ परमार्थव्यवसाय । कराया व्यत्यय कां यावा ॥७७॥
इच्छा फारा दिवसांपासून । करावें नित्य ज्ञानेश्वरीवाचन । परी कांहीं ना कांहीं विन्घ । येऊनि तें हातून घडेना ॥७८॥
भगवद्नीता एक अध्याय । जैसा रोज नेमानें होय । तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय । विनाअंतराय तगेना ॥७९॥
हातीं घेतां इतर ग्रंथ । नित्य नेमें वाचिले जात । ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत । नियम न जात तडीस ॥८०॥
घेऊनि रजा तीन मास । एकदां देव गेले शिर्डीस । तेथूनि निजगृहीं पौंडास । सुखें घ्यावयास विश्रांती ॥८१॥
तेथेंही इतर कार्यें झालीं । इतर नेमाची पोथी वाचिली । ज्ञानेश्वरीची हौस न पुरली । वेळ न आली तियेला ॥८२॥
हातीं घेतां ज्ञानेश्वरी । विकल्प कांही उठावे अंतरीं । जेणें वाचन होई वरिवरी । प्रेम अंतरीं उपजेना ॥८३॥
काय करूनि कासाविसी । केला निश्चय न पावे सिद्धीसी । पांच ओंव्याही नित्यनेमेंसीं । घडलें न प्रतिदिवशीं वाचावया ॥८४॥
प्रत्यहीं पांच ओंव्या निदान । निश्चय केला मनापासून । त्याही न नेमें मह्जहातून । उल्हासे वाचून जाहल्या ॥८५॥
म्हणोनि मग केला नेम ।  साईच जेव्हां देतील प्रेम । म्हणतील “वाच” तेव्हांच उपक्रम । करीन संभ्रमविरहित ॥८६॥
निष्ठा साईंच्या पायापाशीं । जेव्हा साई देतील आज्ञेसी । तेव्हांच वाचीन ज्ञानेश्वरीसी । कृतनिश्चयेंसीं बैसलों ॥८७॥
असो येतां महोदय पर्व । सवें मातोश्री भगिनी सर्व । पहावया गुरुपूजागौरव । पातले मग देव शिर्डीस ॥८८॥
कां हो आतांशा नाहीं वाचत । ज्ञानेश्वरी आपण नित्य । जोग तेथें देवांसी पुसत । प्रत्युत्तर देत तें परिसावें ॥८९॥
ज्ञानेश्वरीची मोठी हौस । परी न ती जाई सिद्धीस । आतां बाबाच जेव्हां वाचावयास । वदतील ते वेळेस वाचीन ॥९०॥
तंव जोग कथिती युक्ती । ज्ञानेश्वरीची आणूनि पोथी । द्यावी साईबाबांचिये हातीं । वाचावी ते देती तंव तुम्हीं ॥९१॥
नलगे मज कांहीं युक्ती । बाबा माझें अंतर जाणती ते कां न माझी अढी पुरविती । ‘वाच’ स्पष्टोक्ति वदतील ॥९२॥
घेतां समर्थांचें दर्शन । रुपया एक केला अर्पण । एकचि कां वीस आण । म्हणती त्यालागून तंव बाबा ॥९३॥
आणूनि वीस रुपये दिधले । रात्रीं बालकरामास भेटले । साईकृपा कैसी पावले । वृत्त त्यां पुसिलें पूर्वील ॥९४॥
उद्यां आरती झाल्यावरती । सांगेन मी सकळ तुम्हांप्रती । ऐसें बालकराम आश्वासिती । बरें म्हणती देव तयां ॥९५॥
पुन्हां देव दुसरे दिवशीं । जातां मशिदीं दर्शनासी । वीस रुपये गामितले त्यांशीं । दिधले सुखसंतोषीं देवांनीं ॥९६॥
पाहूनि तेथें अत्यंत भीड । देव राहिले बाजूस आड । बाबा पुसती कोठें रे सांगड । जागेंत अवघड तो ददला ॥९७॥
देती देव प्रत्युत्तर तेथें । बाबा हा मी आहें  ना येथें । कां सातचि ना झालेत देते । बाबा तंव तयांतें पुसतात ॥९८॥
देव वदती वीस दिधले । ‘पैसे कोणाचें’ बाबांनी पुसिलें । ‘बाबा आपुले’  तंव ते वदले । ‘कां मग सुटले पळत तुम्ही ॥९९॥
यावें ऐसें जवळ  यावें । स्वस्थ चित्तें निकट बैसावें’ । आज्ञेप्रमाणें केलें देवें । मनोभावें ते बैसले ॥१००॥
नित्यनेम आरती झाली । मंडळी स्वस्थानीं परतली । बाळकरामा - देवा गांठ पडली । पृच्छा ती आरंभिली पूर्वील ॥१०१॥
तयांचा पूर्ववृत्तांत पुसिला । तयांनीं तो साद्यंत कथिला । कैसें लावियलें उपासनेला । देव मग तयांला वदतात ॥१०२॥
केलें काय तुम्हां निवेदन । कैसें करावें ब्रम्हाचिंतन । करा कीं माझी जिज्ञासा पूर्ण । देव मग त्यांलागून प्रार्थिती ॥१०३॥
बालकरामही देवांप्रती । करावया तयांची जिज्ञासापूर्ती । उत्तर द्याया जों आरंभ करिती । बाबाच बोलाविती देवांस ॥१०४॥
कैसा साई परम लाघवी । चंद्रूस देवांतें बोलावूं पाठवी । देव न क्षण विलंब लावी । आले श्रीसाईंस भेटाया ॥१०५॥
झाले होते तीन प्रहर । मशिदीचिया तटावर । टेकूनियां दोन्ही कर । दिसले समोरचि श्रीसाई ॥१०६॥
देव जातांच केलें वंदन । बाबा तयांस पुसती प्रश्न । कोठें कोणासीं काय आपण । करीत संभाषण होतां कीं ॥१०७॥
मग देव उत्तर देती । काकांचिया माडीवरती । बालकरामाचिया संगती । आपुलीच कीर्ती परिसियली ॥१०८॥
रुपये आण पंचवीस । बाबा आज्ञापिती देवांस । आणूनियां तेच समयास । रुपये बाबांस समर्पिले ॥१०९॥
किती पुसती आणिलेस । देव वदती पंचवीस । बाबा म्हणती चल ये बैस । गेले तंव मशीदीस बाबांसह ॥११०॥
बाबा बैसले खांबापाशीं । दुजें न कोणीही मशीदीसी । म्हणती तुवां माझिये चिंधीसी । चोरियेलेंसी मज न कळतां ॥१११॥
मला चिंधी ठाऊक नाहीं । म्हणोनि देव देती ग्वाही । येथेंच कोठें तरी पाहीं । झाले मग साई वदते तया ॥११२॥
येथें आहे कोठें चिंधी । ऐसें देव वदले ते संधीं । बाबा उठले म्हणती तूं शोधीं । खोटी ही बुद्धी चोरीची ॥११३॥
कवण्या कारटयानें ती नेली । बघ बघ पाहिजे येथेंच असली । ऐकून देवांनीं आणीक शोधिली । नाहीं ती आढळली तरीही ॥११४॥
मग भ्रुकुटीस घालूनि आंकडे । पाहूनियां इकडे तिकडे । द्दष्टि टवकारुनी देवांकडे । साई कडकडे देवांवर ॥११५॥
म्हणे तूंच लबाड होसी । तुजवीण कोण ये  समयासी । येईल चिंधी चोरावयासी । चोर मी तुजसीच समजतों ॥११६॥
ऐसा येथें जो येतोस । तो काय चोर्‍या करावयास । झाले काळ्याचे पाढंरे केंस । खोड न लवलेश कीं जाई ॥११७॥
तुला कुर्‍हाडीनें हाणीन । तुला कापीन, ठार करीन । जाशील कोठें माझिया हातून । येईन मारीन तेथें तुज ॥११८॥
घरून येतोस जो शिरडीस । तो काय चोर्‍या करावयास । घे हे आपुले वापस । आणून चिंधीस दे माझ्या ॥११९॥
क्रोधें लाल झाले साई । दुद्धारियेली आई माई । शिव्या - शापांची लागली रय़ी । संतापें लाही जाहली ॥१२०॥
कोपले देखूनि साईनाथ । देव कौतुक पाहतात । उगचे उभे राहतात । आश्चर्यभरित मानसें ॥१२१॥
देव सन्निध आणि एकटे । पाळी माराची येणार वाटे । कीं हें विश्वरूपदर्शन गोमटें । जाणूनि दाटे आनंद ॥१२२॥
घेतील काय सटका आतां । करितील काय त्वेषें आघाता । एकला मी सांपडलों हाता । येईल चित्ता तें करो ॥१२३॥
परी हें चिंधीचें काय कोडें । तें तों देवांस कांहींही नुलगडे । जा निघून जा म्हणतां एकीकडे । तंव ते पायरीकडे सरकले ॥१२४॥
काय चिंधीचा गुह्यार्थ । जाणावया मी नाहीं समर्थ । पावेन साईकृपेचा स्वार्थ । तयीं तो श्रोत्यांर्थ निवेदीन ॥१२५॥
होतां अर्ध घटकाभर । आले देव बाबांसमोर । चालूच होता शिव्यांचा गजर । ‘आलास कां वर’ म्हणाले ॥१२६॥
‘जा हो चालता वाडियांत’ । म्हणतां देव आज्ञा वंदीत । नमन करूनि चरणांप्रत । पातले परत वाडियामाजीं ॥१२७॥
झालेली सर्व हकीकत  । घडली जैसी तैसी यथार्थ । जोगांस आणि बालकरामाप्रत । केली निवेदित साद्यंत ॥१२८॥
पुढें एक सबंध घटका । उडाला शिव्याशापांचा दणका । प्रहारा - दोंप्रहरांमागें मग लोकां । बाबाच अवलोका आमंत्रीत ॥१२९॥
देवही मग तेथें आले । इत्रांकाणीं जाऊन बैसले । म्हातार्‍याचिया जीवा लागलें । असेल मग बोले श्रीसाई ॥१३०॥
“चिंधीची ती कथा काय  । तरी म्यां दुरुक्तीं केलें घाय । होतीच चोरिली त्या काय उपाय । बोलल्याशिवाय रहावेना ॥१३१॥
असो अल्ला सारें बघील । तोडी तयाचें बरें करील । तंव ए भाऊ दक्षिणा देसील” । पुसती क्षमाशील श्रीसाई ॥१३२॥
किती आणूं देव पुसती । बारा घेऊनि येईं त्वरिती । पाहूं जातं नोटचि होती । रुपये न मिळती तियेचे ॥१३३॥
देवें तैसेंच बाबांस कथिलें । ‘राहूं दे मज नको’ ते वदले । ‘सकाळीं त्वां दोनदां दिधले । स्मरण न राहिलें मज त्याचें’ ॥१३४॥
तरीही देवांनीं रुपये मिळविले । बाबांलागीं आणूनि दिधले । सवें तयांचे चरणही वंदिले । परिसा मग निघाले जे बोल ॥१३५॥
“काय रे तूं करीत अससी” । ‘कांहीं नाहीं’ वादतां तयासी । पोथी वाचीत जा नेमेंसीं । केले देवांसी आज्ञापन ॥१३६॥
“वाडियामाजी जाऊनि बसावें । नित्यनेमें वाचीत जावें । वाचितांना सांगतही असावें । निरूपण भावें सकळिकां ॥१३७॥
सबंध भरजरी सुंदर शेला । बसलों असतां तुज द्यावयाला । जासी कां चिंध्या चोरावयाला । सवई कां तुजला चोरीची” ॥१३८॥
असो करावें पोथीवाचन । साईमुखींचे हें वचन । पावूनि माझी मी अंतरीं खूण । अतिसुखसंपन्न जाहलों ॥१३९॥
मानूनि ती आज्ञा प्रमाण । मग म्या तया दिवसापासून । नित्य ज्ञानेश्वरीचें वाचन । तैसेंच निरूपण आरंभिलें ॥१४०॥
मिळाली आज्ञा वांछिली आतां । फिटली व्रतस्थ मनाची चिंता । येथूनि मज ज्ञानेश्वरी वाचितां । येईल नियमितता वाचना ॥१४१॥
आतां मी गुर्वनुज्ञाधर । आतां प्रसन्न मज ज्ञानेश्वर । माजी पडलें जें झालें आजवर । वर्तणें अत:पर नियमानें ॥१४२॥
साक्ष मजला माझें मन । वरी साईआज्ञा प्रमाण । आज्ञाबळें पोथी पारायण । आतां मज निर्विन्घ घडेल ॥१४३॥
बाबा मी येतों लोटांगण । अनन्यभावें तुम्हां शरण । पदरीं घ्या या लेंकरा । आपण । करवूनि घ्या वाचन मजकरवीं ॥१४४॥
चिंधी तें काय ध्यानांत आलें । बालकरामास होतें जें पुसिलें । त्याच चिंध्या तेंच न रुचलें । साईंस, जैं भरले रागानें ॥१४५॥
कैसें तुम्हांस उपासनेस । कैसें परब्रम्हाचिंतनास । लाविलें म्हणूनि बालकरामास । पुसिलें तें बाबां नावडलें ॥१४६॥
वाटेल त्या प्रश्नाचें उत्तर । स्वयें द्यावया असतां तत्पर । किमर्थ चौकशा कराव्या परस्पर । म्हणोनि मज दुर्धर छळियेलें ॥१४७॥
‘छळियेलें’ हे बोलचि उद्धत । प्रेमें भक्तार्थ जो ओथंबत । भक्तच्छल ज्या स्वप्नींही न दिसत । छळणें त्या अनुचित क्रियापद ॥१४८॥
छळिलें नव्हे मज शिकविलें । चित्तीं तुझिया जें जें उद्भवलें । तें तें म्यां पाहिजे स्वयें पुरविलें । कधीं न चोरिलें कामा ये ॥१४९॥
साई बाह्यक्रोधाभिभूत । अंतरीं ते नित्य मुदित । बाह्यसंतापें दिसत संतप्त । अंतरीं ते तृप आनंदें ॥१५०॥
क्रोधाचें बाह्य लौकिक लाघव । अंतरीं पमानंद - गौरव । तया साईंचें लीलावैभव । गावया सुदैवचि पाहिजे ॥१५१॥
साधावया निजस्वार्थ । जयापोतीं अत्यंत आर्त । शिव्या पुष्पलाखोल्या मानीत । द्दष्टीं निजहिततत्पर ॥१५२॥
परिसूनि कर्णकटु अश्लील वचन । डळमळेना देवांचें मन । पोटीं प्रेमाचें भरतें गहन । वाटे तें ताडण पुष्पांचें ॥१५३॥
दुग्धें भरली धेनूची कांस । भाग्यवानास  लाभे गोरस । कांसेपासींच गोचिडा वास । अशुद्धचि कर्मास तयाच्या ॥१५४॥
दर्दुरा कमलकंदा शेजार । लुटी कमललमकरंद भ्रमर । दर्दुरा पंकाचा आहार । दैवास न पार भ्रमराच्या ॥१५५॥
तैसे तुम्ही भाग्यवान । तुम्हां आम्हां संनिधान । मानेल तें घ्या रे पुसून । शंकासमाधान साई वदे ॥१५६॥
पहा माझी पोथीची अढी । वाचीन ‘वाच’ वदतील ते घडी । तोंवर ज्ञानेश्वरी मी नुघडीं । पुरविली रोकडी बाबांनीं ॥१५७॥
कैसी माउली करी लाड । निजबालकाचे पुरवी कोड । तयाची ही प्रतीती गोड । भक्तीची जोड ही कथा ॥१५८॥
वाच म्हणूनि नाहीं थांबले । देव वदती वर्ष न उलटलें । स्वप्नीं येऊनि दर्शन दिधलें । आश्चर्य मज पुसिलें तें परिसा ॥१५९॥
सन एकूणीसशें चवदा । एप्रील दुसरी तारीख तदा । वार ग्रुरुवार उजाडतां एकदां । स्वप्नप्रसादा पावलों ॥१६०॥
समर्थ साई स्वप्नीं आले । आहेत माडीवरती बैसले । पोथी समजते कां मज विचारिलें । उत्तर दिधलें नकारीं ॥१६१॥
तैसाच प्रश्न झाला नंतर । मग ती केव्हां समजणार । आलें माझिया नेत्रांस नीर । काय म्यां प्रत्युत्तर दिधलें ॥१६२॥
कृपा आपुली झालियावीण । पोथी वाचणें केवळ शीण । समजणें तो त्याहूनही कठिण । बाबा मी निक्षून सांगतों ॥१६३॥
बाबा वदती “पोथी पढतां । फारचि आपण घाई करितां । वाचा पाहूं ती मजदेखतां । निकट बैसतां मजपाशीं” ॥१६४॥
काय वाचूं देव वदती । अध्यात्माची आज्ञा देती । देव पोथी आणूं जाती । नेत्र उघडती तात्काळ ॥१६५॥
देव तेव्हां जागे होती । स्वप्नस्थिती पाहुनी निश्चिती । काय वाटावें तयांचे चित्तीं । कल्पना श्रोतीं कीजे ती ॥१६६॥
पाहूनियां वर्षभर वाट । मानी कीं बाळ आज्ञा नीट । करितो कीं नित्य । चुके कोठें वा किनिमित्त । कवण हें सतत पाहील ॥१६८॥
वाचकें असावें कैसें दक्ष । ठेवणें कोठें विशेष लक्ष । साईमाउलीवीण प्रत्यक्ष । कवण ही साक्ष पटवील ॥१६९॥
ऐसी साईसमर्थलीला । ऐसा स्वानंदाचा सोहळा । भक्तीं भोगिला असंख्य वेळां । देखिला म्यां डोळां प्रत्यक्ष ॥१७०॥
आतां आपण श्रोते मंडळी  । होऊं कीं लीन गुरुपदकमळीं । परिसूं पुढील कथेची नव्हाळी । यथाकाळीं पुढारा ॥१७१॥
आठवूनि श्रीसमर्थचरण । सद्भावें मी येई लोटांगण । तेणेंच सकल भवदु:खविमोचन । भावार्थें शरण हेमाड ॥१७२॥
साईच एक तयाचा स्वार्थ । साईच निरतिशय - सुखपरमार्थ । साईच तया करील कृतार्थ । निश्चित हा भावार्थ तयाचा ॥१७३॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । साईकृपानुग्रहदानं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ALSO READ: साईसच्चरित - अध्याय ४२

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री संतोषीमाता माहात्म्य