Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजा शिव छत्रपती

webdunia
webdunia

प्रगती गरे दाभोळकर

बुधवार, 11 मार्च 2020 (15:18 IST)
मित्रांनो सध्याचं वातावरण पाहून मन फार सुन्न झालं आहे, काय विकट स्थिती उभी राहिली आहे. कोणी दंगे करतयं, कोणी दगडफेक, कोणी सैन्याला मारहाण करतयं, कोणी अफवा पसरवतय. कोण कोणाचा शत्रू आहे कळतचं नाही. राष्ट्र प्रेमाची परिभाषा काय आहे कळतच नाही. काय सिद्ध करायचं आहे ?? सगळं कोणत्या दिशेला चाललयं? विचार केला तर वेड लागण्याची वेळ येतेय. कोण आहोत आपण??? कोणत्या स्थितीत आहोत आज?? इथंवर कशे पोहोचलो? कल्पना करू शकतं का कोणी?? 
 
एखाद्याला वेडंवाकडं बोलणं, त्याचा कामावर टीका करणं, जनप्रतिनिधी असो किंवा मंत्री, सरळ जे तोडांत येईल ते बरळायचं. शत्रुत्व, वैर, मत्सर, जात-पात, वर्ण, उपजीविका, राहाणी अरे कित्ती आणि काय-काय मुद्दे आहे भांडायला. पण इतकं सगळं बोलायचं, वाटेल ते करायचं, हवं तसं वागायचं, कुठेही राहायचं, काहीही करायचं, इतकं सगळं कसं शक्य झालंय?? हा माज करायला आपण इथे आहोत, ते कसे?? कोणामुळे हे मोकळं वातावरण आपल्याला लाभलं आहे?? कोणामुळे आपल्याला या राष्ट्राचा आपल्या धर्माचा अभिमान बाळगता येतोय?? विचार केलाय कधी???
 
नाही केला ना??? मग आता तरी करा. जरा मागे वळून पहा, इतिहासात जायची गरज़ आहे आज आपल्याला. तो अजरामर इतिहास ज्यामुळे आज आपण ताठ मानेने वावरतोय. तो इतिहास ज्यामुळे आपले संस्कार आणि संस्कृती टिकून राहिली.  प्रत्येकाला अभिमान वाटावा असा तो इतिहास आहे. 
 
आजवर आपण शिवाजी महाराजांबद्दल अनेक पुस्तकं वाचली आहेत, अनेक व्याख्यान आणि भाषणं ऐकली आहेत पण एकंदरीत वातावरण पाहता आज पुन्हा एकदा ते सगळं आठवायची गरज़ आहे. फक्त त्यांचा जयंती आणि पुण्यतिथीला पुष्प वाहणे आणि दिवा लावणे ही काही त्यांची आठवण करणे नाही. एखाद्या दिवशी कार्यक्रम करून किंवा संगीत, नृत्य, नाटिका अश्या विविध प्रकारांने त्यांना मानवंदना करणे हे पुष्कल आहे असा गैरसमज आपण मनात ठेवतो पण आपण महाराजांबद्दल किती आणि काय जाणतो?? आज मुलांना आणि तरूणांना त्यांचा कोणत्या गुणांबद्दल सांगणं आवश्यक आहे?? हा शोधाचा विषय आहे
 
 
"शिवरायांचे आठवावे रूप
 
शिवरायांचा आठवावा साक्षेप
 
शिवरायांचा आठवावा प्रताप
 
या भूमंडळी"
 
 
 
मराठ्यांचे नाव इतिहासात अजरामर करून ठेवणार्या अशा या महाप्रतापशाली राष्ट्रीय वीराच्या अतुल पराक्रमाचे वर्णन करावे तितके कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म "भोसले" या कुळात झाला. हे क्षत्रिय घराणे सुदूर उत्तरेतील विंध्य पर्वतावर स्थित चित्तौड़(मेवाड) चा रजपूत वीरांनी महाराष्ट्रात स्थापन केलेले. महाराणा प्रताप, राणा सांगा, वीरांगना पद्मिनी अशा शूरवीर आणि बलिदानी लोकांनी भरलेले हे घराणे, पुढे तोच वारसा शहाजी राजे, शिवाजी राजे व शंभू राजेंनी  चालवला.
 यवनांपासून स्वराज्य व स्वातंत्र्य रक्षण त्यांनी मोठ्या शौर्याने केले. 
1303 साली अल्लाउद्दीन खिलजीने चित्तौड़ वर हल्ला केला, त्याने रत्नसिंग आणि भीमसिंग यांच्या घराण्याचा विध्वंस केला, राणी पद्मिनी व इतर कुलीन स्त्रियांनी स्वताला आगीत झोकून वीरतेचा कळस केला, त्यावेळी भीमसिंग याच्या कुळातील काही माणसे आपले प्राण वाचवून दक्षिणेकडे पळाले व त्यांनी अरावली पर्वतावर आपली वस्ती केली. गावाची पाटीलकी पत्करली परंतू मनात यवनांपासून झालेल्या छळाचा सूड कसा घ्यायचा हे विचार सतत् यायचे. ज्या यवनांनी रजपूतास येवढं छळलं, त्यांना नामेट करायच, हाच ध्यास मनी होता. "जो पर्यंत यवनांशी लढून बदला घेणार नाही, दाढी- मिश्या काढणार नाही" अशी प्रतिज्ञा त्या कुळातील पुरूषांनी देवासमोर केली. "भोसकर" या गावात स्थायी झाल्यामुळे ही मंडळी "भोसले" हे आडनाव लावू लागली. 
 
 
पुढे मालोजी राजे आणि शहाजी राजे हे आपल्या कर्तृत्व आणि शौर्याने मनसबदार या पदावर पोहचले व हळूहळू पुढे वाढू लागले. बाहेरचं वातावरणात अत्यंत कष्टदायक होतं. सगळीकडे मोगलांचं वर्चस्व. त्यांचा आज्ञेनुसार वागणं आणि राहणं हेच सर्वांच भाग्य होऊन बसलं होतं. अशातच् 1630 साली शहाजी राजे आणि जिजाऊ कडे पुत्राचा जन्म झाला. अत्यंत विकट परिस्थितीत आणि मोगलांची धामधूम सुरू असताना शिवबा कलेकलेने वाढत होता. सुरूवातीचे दहा वर्ष लहानग्या शिवबाला घेऊन विविध किल्लांवर जिजाऊनां राहावे लागले परंतु त्यांने धीर सोडला नाही किंवा दुसरीकडे आश्रय घेतला नाही. शिवबाळाला अगदी लहानपणापासून दिसत होता तो आपल्या आऊंचा खमकेपणा, पातिव्रत्य धर्म आणि स्वतःच आणि पुत्राच रक्षण करण्याचा निर्धार आणि मग तो त्या अत्यंत तेजस्वी, मानी, निर्भीक , आणि द्रुढनिश्चयी मातेच्या छत्रछायेत वाढू लागला. 
 
पुण्यात आल्यावर दादोजी कोंडदेव, शामराव नीलकंठ, बाळकृष्ण पंत अश्या विश्वासु आणि हुशार मंडळीसोबत शिवबा आयुष्याचे निरनिराळे धडे शिकू लागला. एक गुण त्याला इतरांपेक्षा वेगळा करायचा तो म्हणजे यवनांची चाकरी त्यांना मान्य नसे. वडीलधारी सांगायचे की स्वधर्म रक्षण करायचं परंतु आदिलशाहीची नोकरी करून पण शिवबांना हे कधीही पटलं नाही. 10 वर्षाचे असताना त्यानी सगळ्यांसमोर आपलं मत स्पष्ट पणे मांडलं की "जो देवाब्राम्हणाची विटंबना करतो, गोहत्या करतो, असा मालक आणि त्याची नोकरी मला मान्य नाही." 
 
 
 
आजच्या विज्ञानाच्या काळात गर्भारपणात निरनिराळ्या गोष्टी करायला सांगतात. चांगलं ऐका, चांगलं वाचा, आनंदी रहा, पोषक अन्न खा, जेणेकरून होणारं बाळ स्वस्थ होईल, सदाचारी होईल पण आपण एकदाही हा विचार केला आहे का की शिवबा गर्भात असताना तिसर्‍या महिन्यापासूनच जीजाबाईंवर घोर संकटं आली व त्यांचा जन्म झाल्यावर तर या माता आणि पुत्राला तब्बल दहा वर्षे इकडून तिकडे हिंडाव लागलं. अशात तर एखाद्या बाळाला फार विचित्र आणि विक्षिप्त व्हायला हवं, कारण आजतर अनेक लोकं आपल्या स्वभावासाठी परिस्थितीला दोष देतात परंतु शिवबांचा बाबतीत तसे काही झाले नाही, कारण महापुरुष निर्माण होण्यास जशी अनुकूल परिस्थिती आणि सुशिक्षण हे कारणीभूत असतं. त्याहून जास्त त्याचा माता- पित्याची सदव्रुत्ती आणि संस्कार महत्वाचे असतातं. 
 
 
 
आई ही प्रथम गुरू हे उगाच म्हणत नाही. शिवाजी महाराजांना जीवनातील प्रथम दहा वर्षे आपल्या या गुरूकडून शिक्षणाव्यतिरिक्त नैतिकता, माणूसकी, स्वाभिमान आणि सदाचरण अश्या मौल्यवान गुणांचे बीजारोपण झाले. समज आल्यावर त्यांना स्वधर्माविषयी अतूट श्रद्धा आणि आदर निर्माण झालं. निर्दोष आणि कमजोर लोकांवर अत्याचार करणारे अत्यंत निद्यं आणि विपत्तिमूलक आहे हे त्यांना पटले. अशा लोकांची चाकरी करून योगक्षेम चालवायचा नाही ही शप्पथ त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी घेतली. शिवाजी महाराजांच्या गुणांचे किती आणि काय वर्णन करावे ते कमीच पण आजच्या या परिस्थितीत त्यांचातले काही गुण प्रकर्षाने आठवावे वाटतात 
 
 
1) स्वधर्म प्रीति- महाराज अतिशय बुद्धिमान व चपळ तर होतेच परंतु फार लहापणापासूनच त्यांना आपल्या धर्माचा अभिमान होता. वडिलांनी उभारलेल्या दौलतीवर निर्वाह त्यांना मान्य नव्हता. धर्माची होणारी विटंबना आणि अनादर त्यांना सहन होत नसे. स्वराज्य आणि स्वातंत्र्य हेच त्यांचे हेतू. त्यासाठी स्वप्राण गमवावे लागले तरी हरकत नाही असं त्यांच स्पष्ट मत. 
 
 
 
2) धर्म निरपेक्षता - आपल्या धर्मावर प्रेम याचा अर्थ दूसर्या धर्माच्या लोकांना त्रास देणे किंवा त्यांचा धर्मपालनात व्यत्यय आणणं असे नाही. शिवरायांनी कधीही इतर धर्मियांना रोखले नाही, उगाच शासन केले नाही व त्यांचावर विनाकारण कोणतेही अत्याचार होऊ दिले नाही. सगळ्या जातिधर्मासाठी त्यांचे दरबार मोकळे होते. त्यांचा विरोध कोणत्याही धर्माबद्दल नसून वाईट विचार आणि दुराचारीलोकांशी होता. यवन हे दुष्ट असून सामान्य जनतेला विनाकारण त्रास देणारे, लूटपाट करणारे, स्त्रियांचा शीलभंग करणारे होते. यास्तव महाराजांनी त्यांचा विरोधात स्वराज्याची स्थापना करण्याचा विडा उचलला.
 
 
 
3) निःपक्षपात बुद्धी- हा एक अत्यंत विलक्षण गुण आहे जो त्यांचा ठायी होता व त्यांचाबद्दल वाचताना, ऐकताना वारंवार याचा प्रत्यय मिळतो.
 एखाद्याच्या गुणांची पारख करून त्या व्यक्तीला योग्य कामं देणं हे शिवरायांना अचूक जमायचं मग समोर कोणत्याही जाति व धर्माचा माणूस असला तरी ते अत्यंत युक्तिने त्याला कामगिरी सोपवायचे. त्यांच वर्तन निष्कपटी आणि मैत्रीपूर्ण असायचं. आदर व प्रेमयुक्त भाषेत समजवलं आणि एकदा कोणावर विश्वास टाकला की कपटी मनुष्य ही आपला होतो हा त्यांचा सिद्धांत होता. 
 
 
 
4) प्रजेवरचं प्रेम- एक सफल शासकात हा गुण असणे फार आवश्यक आहे. शिवरायांनी राज्यव्यवस्था हा भाग इतक्या उत्कृष्ट रीतिने पार पाडला होता की राम राज्यानंतर लोकं "शिवशाही" चे उदाहरण देतात. 
शेतकरी, व्यापारी, उद्यमी, मजदूर, किंवा यांचाही खालचा माणूस, त्याचे त्रास, त्याचा गरजा हे सगळं ते फार आपुलकी आणि प्रेमाने विचारायचे. त्यांचा उत्कर्ष व्हावा, ते परावलंबी न राहो अशी नीति बाळगून त्यांनी राज्य केलं. प्रजेवर अन्याय करणारा, त्यांना त्रास देणारा कितीही आपला आणि जवळचा असला तरी त्याला कठोर शिक्षा केल्याशिवाय त्यांनी सोडले नाही. त्यांचे अष्टप्रधान म्हणजे आठ रत्नचं होते. महाराजांच्या अनुपस्थितीत पण कोणालाही चुकीचे शासन कधीही होणार नाही याची पूर्ण खात्री त्यांना या आठही माणसांकडून होती. 
 
 
5) स्त्रियांचा आदर- महाराजांच्या कौटुंबिक आणि व्यवहारिक वर्तनातून झळकणारा हा सर्वात मोठा गुण.
 शिवराय निर्व्यसनी तर होतेच, त्याच सोबत त्याचं आचरण सदाचारी होतं. द्रुढनिश्चयी आणि साहसी तर होतेच तसेच कुशल आणि बुद्धिमानही होते परंतु एक गुण हा अत्यंत विलक्षण होता तो म्हणजे स्रियांचा आदर. 
आज आपल्या धर्माला नावं ठेवणारे व अर्धवट ज्ञानाचा जोरावर हे सांगणारे की हिंदूंकडे स्रियांना स्वातंत्र्य नाही, भेदभाव होतो, अश्या सगळ्यांनी शिवाजी महारांजाच चरित्र लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या समोर हिंदू स्त्री असो किंवा यवन, त्यांनी कधीही अनादर केला नाही. त्यांच्या राज्यात कोणत्याही स्त्रीचा अपमान झाला नाही व ज्यांनी असा पाप करण्याचा प्रयत्न केला तो कोणीही का नसो, महाराजांच्या कठोर शिक्षेतून सुटला नाही. 
 
"शिवशाही"त बायकांना पूर्ण अधिकार प्राप्त होते. कारभारात आणि मसलतीत त्यांचे विचार आणि निर्णय स्वीकारले जात होते. स्वता महाराज जिजाऊंच्या शब्दाबाहेर नव्हते. त्यांच्या पत्नी तसेच सुनांना पण आपलं मत आणि विचार मांडायची मोकळिक होती. कुलमुख्त्यार म्हणून त्यांना मसलती करायची आणि निर्णय द्यायचा अधिकार होता. 
असे शिवरायांच्या गुणांचे वर्णन करावे तितके थोडे. 
आपल्या धर्माच पालन करत, इतर धर्मांचं आदर करणं, आपल्या उन्नती सोबत इतरांची प्रगती व्हावी. आपल्या प्रजेला, सामान्य माणसाला आपल्या कर्तव्याची, धर्म रक्षणाची, धाडसाची व वेळपडली तर हातात तलवारी घेऊन शत्रुला मात करण्याची शिक्षा आपल्याला या चरित्रातून मिळते. 
 
आज भारतातील नेते, पुढारी, राजकारणी लोकांनी आचरणात आणावं असं शिवरायांच जीवन आहे. 
 
शिवरायांनी जे व्रत पाळलं आणि जसे ते जगळे ते आजच्या तरुण मुलांना कळणं हे फार गरजेचं आहे. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन, स्रियांसाठी असलेले आदर, आपुलकी, जिव्हाळा, सगळ्यांना बरोबरीने वागवणं, ह्या प्रत्येक गोष्टीच अध्ययन आणि विचार नितांत आवश्यक आहे. 
 
आज जे काही घडतयं, जी परिस्थिती निर्माण झाली आहे दिल्ली असो हैदराबाद असो किंवा जबलपूर, सगळं विचित्र होत चाललयं. म्हणून आतातरी मागे वळून पहा, इतिहास चाळा, वाचा, लिहा, बोला पण असे गप्प राहू नका
.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुका आभाळाएवढा