Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bail Pola 2022 शेतकर्‍यांचा पारंपरिक बैल पोळा

Bail Pola 2022 शेतकर्‍यांचा पारंपरिक बैल पोळा
, शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (11:56 IST)
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
 
पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते.
 
शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.
 
महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.
 
याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' अतित कोण ?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.
 
- संदीप पारोळेकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pithori Amavasya 2022 Katha पिठोरी अमावस्या कहाणी