अभिनय, सौंर्दय आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुबईत हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या, तर दुसरी मुलगी जान्हवी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर बोनी कपूर यांचे धाकटे बंधू संजय कपूर सकाळी दुबईत दाखल झाले. 'खलिज टाइम्स'ने त्याच्याशी संवाद साधला असता, श्रीदेवी यांच्या जाण्याने आम्ही कुटुंबीयांवर फार मोठा आघात झाल्याचे त्यांनी सांगितले. श्रीदेवीच्या मृत्यूबाबत बोलताना ते म्हणाले शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्या हॉटेलमधील रूममध्ये होत्या. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या राशिद हॉस्टिपलमध्ये नेण्यात आले. तेथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जे काही घडले ते आमच्यासाठी फारद धक्कादायक आहे. असे कही होईल असे कुणालात वाटले नव्हते. श्रीदेवी यांना याआधी कधीच हृदयविकाराचा त्रास झालेला नव्हता, अशी माहितीही संजय कपूर यांनी दिली. विवाह सोहळ्यात त्यांनी भरपूर धम्माल केली. लग्नानंतरच्या स्वागत सोहळ्यात डान्स करतानाही त्यांना कॅमेर्याने टिपले आहे. मात्र, हा विवाह सोहळा आटोपल्यानंतर काही वेळातच त्यांना काळाने गाठले. दुबईत नियमाप्रमाणे विदेशी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण शोधले जाते. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी येथील भारतीय दुतावासाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्याप्रमाणे श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जईल. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.